Jos Buttler : आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या इंग्लंडच्या टीमची कामगिरी फारच निराशाजनक दिसून येतेय. कर्णधार जॉस बटरलच्या नेतृत्वाखाली टीमला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडने आतापर्यंत 5 सामने खेळले असून केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवणं शक्य झालं आहे. गुरुवारी श्रीलंकेच्या टीमने देखील इंग्लंडचा पराभव केल्याने सेमीफायनल गाठण्याच्या सर्वच आशा आता मावळल्या आहेत.
26 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या टीमची पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडने 33.2 ओव्हरमध्ये केवळ 156 रन्स बनवले. यावेळी इंग्लंडची संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या टीमने अवघ्या 25.4 ओव्हर्समध्ये विजय मिळवला. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर फार निराश दिसून आला.
श्रीलंकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला की, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मधील कामगिरीमुळे तो खूप निराश आहे. टीम सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही, असे त्याचे मत आहे.
बटलर म्हणाला, “आमच्यासाठी ही अत्यंत कठीण आणि निराशाजनक स्पर्धा होती. मी स्वत:च्या आणि खेळाडूंच्या कामगिरीवरून निराश झालोय. सध्या याचे कोणतंही स्पष्ट उत्तर नाही. टीमच्या प्रयत्नांना दोष देऊ शकत नाही, परंतु आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये खूप कमी पडलो. एक कर्णधार म्हणून, तुम्हाला नेतृत्व करायचं आहे आणि चांगले खेळायचंय. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही."
“मला वाटतं की, ही कदाचित सर्वात मोठी निराशा आहे, की आम्ही आमच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये कमी पडलो. टीममध्ये अनेक अनुभवी क्रिकेटपटू आहेत. एका रात्रीत वाईट संघ बनत नाही. अनेक विकेट पडल्या, त्यामुळे रूट रनआऊट झाला. आमच्या टीमच्या तुम्हाला अशा चुका दिसत नाहीत. स्पर्धेमधील उर्वरित सामन्यांमध्ये चांगले क्रिकेट खेळून आम्हाला कमबॅक करायचं आहे,” असंही बटलरने म्हटलंय.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगाशी आला. इंग्लंडची टीम 33.2 ओव्हर्समध्ये 156 रन्सवर ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात पथुम निसांका आणि सदिरा समरविक्रम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने 25.4 ओव्हर्समध्ये 160 रन्स केले आणि सामना 8 विकेट्सने जिंकला. तर श्रीलंकेचा हा सलग दुसरा विजय होता.