Bois Locker Room Case: पोलिसांच्या सायबर क्राईम पथकाकडून ग्रुप बनवणारा अटकेत

संबंधीत सर्व मुलांचे फोन जप्त करण्यात आले आहेत.

Updated: May 6, 2020, 06:02 PM IST
Bois Locker Room Case: पोलिसांच्या सायबर क्राईम पथकाकडून ग्रुप बनवणारा अटकेत

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम पथकाने Bois Locker Room प्रकरणातील एका मुलाला ताब्यात घेतलं आहे. हा मुलगा नोएडातील एका शाळेत शिकत असून या मुलाने याच वर्षी 12वीची परीक्षा दिली असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाने हा ग्रुप बनवला होता आणि हाच मुलगा एकटा ग्रुप ऍडमिन होता. 

आतापर्यंत ग्रुपमधील  15 मुलांची चौकशी करण्यात आली आहे. त्यापैकी अधिकांश मुलं अल्पवयीन आहेत, तर काही प्रौढ आहेत. या ग्रुपमधील 27 जणांची माहिती मिळाली होती. सर्वांची ओळख पटली असून आतापर्यंत 15 मुलांची चौकशी करण्यात आली आहे. संबंधीत सर्व मुलांचे फोन जप्त करण्यात आले आहेत.

हे प्रकरण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील असून बॉइज लॉकर रुम Bois Locker Room या एका चॅट ग्रुपशी निगडीत आहे. या ग्रुपमध्ये सामिल असणारी तरुण मुलं मुलींबाबत अश्लिल आणि आक्षेपार्ह गोष्टींची चर्चा करत होते. या ग्रुपचे काही स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर याबद्दल बरीच टीका करण्यात आली. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामकडून यासंबंधी सर्व आक्षेपार्ह डेटा हटवण्यात आला आहे.

बॉईज लॉकर रुम हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टात तीन वकिलांच्यावतीने पत्र लिहून बॉईज लॉकर रुम प्रकरणाची सुनावणी करण्याची विनंती केली गेली आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती कोर्टाकडे करण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ गोपनीयतेशीच निगडीत नाही तर महिलांच्या सुरक्षेशीही संबंधित असल्याचं याचिकेत सांगण्यात आलं आहे. तसंत अल्पवयीन मुलांचं समुपदेशन करण्याचीही बाबही यात मांडण्यात आली आहे.