Unlimited Calling, Data Plan कायमचे बंद? Jio, Airtel, Vi युझर्सला फटका; कंपन्या एकवटल्या पण...

Jio Airtel Vodafone Users Shocking News: सध्या या प्रकरणावरुन टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच सरकारी यंत्रणांकडूनही यासंदर्भात चाचपणी केली जात असल्याने भविष्यात एखादा मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 29, 2024, 09:03 AM IST
Unlimited Calling, Data Plan कायमचे बंद? Jio, Airtel, Vi युझर्सला फटका; कंपन्या एकवटल्या पण... title=
ट्रायला कंपन्यांनी कळवली आपली भूमिका

Jio Airtel Vodafone Users Shocking News: भारतीय टेलिकॉम क्षेत्रामधील ग्राहकांना सर्वाधिक दिलासा देणारी गोष्ट लवकरच कायमची बंद होण्याची दाट शक्यता आहे. ही गोष्ट म्हणजे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा प्लॅन! सध्या सुरु असलेल्या चर्चेमुळे अनेकांना आता यापुढे अनलिमिटेड कॉलिंग डेटा प्लॅनचा वापर करता येणार की नाही याबद्दल शंका वाटत आहे. कारण टेलिकॉम रेग्युलेट्री अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे रिचार्ज या धोरणासंदर्भात कंपन्यांचं मत मागवलं आहे. खरोखरच पुन्हा हे असं धोरण लागू झालं तर ग्राहकांना प्रत्येक गोष्टीसाठी पुन्हा पैसे मोजावे लागतील असं चित्र दिसत आहे. याबद्दल कंपन्यांनी काय म्हटलं आहे पाहूयात...

कंपन्या काय म्हणाल्या?

जिओ, एअरटेल, व्होडाफोनने नुकताच टेलिकॉम रेग्युलेट्री अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायला एका पत्राद्वारे महत्त्वाची माहिती दिली आहे. या पत्रामध्ये कंपन्यांनी अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅनसंदर्भातील भविष्यातील योजनेबद्दल कंपन्यांनी इशारा दिला आहे. कंपन्यांनी सध्या ज्या पद्धतीने काम सुरु आहे ते अगदी योग्य असल्याचं सांगत आपली बाजू मांडली आहे. सध्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करण्याची गरज नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा रिचार्ज करण्याऐवजी एकामध्येच अनेक सुविधा कंपनीकडून पुरवल्या जातात असं कंपन्यांनी ट्रायला कळवलं आहे.

वेगवेगळं रिचार्ज केलं तर...

एअरटेलने ट्रायला पाठवलेल्या पत्रामध्ये, सध्याचे प्लॅन हे अगदीच सोपे आणि सुटसुटीत आहेत असं म्हटलं आहे. हे प्लॅन वापरकर्त्यांच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचंही एअरटेलने म्हटलं आहे. या प्लॅनमध्ये व्हॉइल कॉल, डेटा आणि एसएमएस सेवा पुरवल्या जातात. यामध्ये कोणतेही छुपे दर आकरले जात नाहीत. त्यामुळे वापरकर्त्यांना ते कोणत्या सुविधा वापरत आहेत याची पूर्ण कल्पना असते. आता पुन्हा आधीप्रमाणे फोन कॉल, एसएमएस आणि डेटासाठी वेगवेगळे रिचार्ज पद्धत आणली तर ती या क्षेत्रातील पिछेहाट ठरेल. ही अशी पद्धत कालबाह्य झाली असून अशा अनेक रिचार्जमुळे ग्राहकांना अधिकचा खर्च करावा लागेल आणि त्याचा बोजा त्यांच्या खिशावर पडेल, असं एअरटेलने सांगितलं आहे.

जीओकडून एअरटेलचं समर्थन

एअरटेलच्या म्हणण्याचं समर्थन जिओनं केलं आहे. जिओनं एका सर्वेक्षणातील आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये 91 टक्के वापरकर्त्यांनी सध्याचे प्लॅन हे सर्वात स्वस्त असल्याचं मत नोंदवलं आहे. तर 93 टक्के लोकांनी सध्याचे प्लॅन हे किफायतशीर आणि परवडणारे असल्याचं मत मांडल्याचं या सर्वेक्षणात आहे. या आकडेवारीच्या आधारे सध्याची पद्धत ही सर्वात उत्तम आणि लोकांनाही मान्य होणारी असल्याचं जिओनं म्हटलं आहे. एकाच रिचार्जमध्ये सर्व सुविधा हे ग्राहकांच्या दृष्टीने अधिक फायद्याचं, कमी कटकटीचं आणि परवडणारं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

कंपन्या एकटवल्या

सध्याच्या टेलीकॉम सेवांमध्ये डेटा हा केंद्रस्थानी असल्याचं कंपन्यांनी ट्रायला कळवलं आहे. त्यामुळेच सध्या डेटा केंद्रीत प्लॅनच्या माध्यमातून केली जाणारी रिचार्जची विक्री हा सर्वोत्तम पर्याय असून वापरा तसे पैसे द्या या मॉडेलपेक्षा आताचं इंटीग्रेटेड मॉडेल जास्त सोयीचं असल्याचं कंपन्यांचम् म्हणणं आहे. ट्रायच्या या नव्या प्रश्नावर संपूर्ण टेलिकॉम इंडस्ट्री एकत्र आल्याने आणि या गोष्टीला विरोध करत असल्याने खरंच यात बदल केला तर यंत्रणा कोलमडून पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या चाचपणीनंतर ट्रायने कोणताही निर्णय घेतला तरी तो टेलिकॉम क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.