Mahindra Bolero: भारतीय मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच SUV सेगमेंटची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांकडून गाडी घेताना SUV सेगमेंटला प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या वर्चस्व गाजवत असून यामधील एक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आहे. कंपनीने SUV सेगमेंटमध्ये अनेक पर्याय दिले आहेत, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. नुकतंच कंपनीने मार्केटमध्ये XUV700 पासून ते Scorpio N आणि THAR असे अनेक मॉडेल आणले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे सर्व मॉडेल लोकप्रिय असतानाही सर्वाधिक विक्री होणारी गाडी Bolero आहे.
विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या एप्रिल महिन्यात महिंद्राच्या बोलेरोची सर्वाधिक विक्री झाली आहे. या महिन्यात बोलेरोच्या 9617 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यातील आकडेवारी पाहिली तर तेव्हा 2717 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच बोलेरोच्या विक्रीत तब्बल 255 टक्के वाढ झाली आहे. बोलेरोच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे.
दुसरीकडे Mahindra Scorpio सर्वाधिक विक्री झालेली दुसरी SUV ठरली आहे. एप्रिल महिन्यात कंपनीच्या 9054 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ही आकडेवारी 7686 इतकी होती. THAR बद्दल बोलायचं गेल्यास गेल्या महिन्यात 5302 युनिट्सची विक्री झाली आहे.
Mahindra Bolero दोन वेगवेगळ्या स्टाइलमध्ये घरगुती बाजारात उपलब्ध आहे. एक आहे क्लासिक बोलेरो आणि दुसरी बोलेरो नियो. क्लासिक बोलेरोत कंपनीने 1.5 लीटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 75PS ची पॉवर आणि 210Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 5-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.
तर बोलेरो नियोमध्ये 1.5 लीटर क्षमतेचं mHawk 100 डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 1000 बीएचपी पॉवर आऊटपूट आणि 260Nm चा टॉर्क जनरेट करतं. क्लासिक बोलेरोची किंमत 9.78 लाख ते 10.79 लाखांपर्यंत आहे. तर बोलेरो नियोसाठी 9.63 लाख ते 12 लाख 14 हजार मोजावे लागतात. या एक्स शोरुममधील किंमती आहेत.
महिंद्राने तब्बल 23 वर्षांपूर्वी 2000 मध्ये बोलेरो कारला पहिल्यांदा लाँच केलं होतं. या गाडीचं मूळ डिझाइन Mahindra Armada Grand वर आधारित आहे. याच्य फर्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये Peugeot 2.5 लीटर क्षमतेचं IDI इंजिन देण्यात आलं आहे. चांगला परफॉर्मन्स आणि स्पेस यामुळे ग्रामीण भागांमध्ये या गाडीला जास्त पसंती दिली जाते. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये पोलीस विभागदेखील या गाड्यांचा वापर करताना दिसतात.