Unsafe Cars In India: भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेव्हा मायलेज आणि विश्वासार्ह इंजिनचा प्रश्न येतो तेव्हा लोक डोळे बंद करुन मारुतीच्या गाड्या खरेदी करतात. मारुतीच्या कारमध्ये आता नव्या जनरेशनला लक्षात घेत आता अनेक नवे बदल केले आहेत. पण सुरक्षेच्या बाबतीत मात्र मारुतीच्या गाड्या अद्यापही इतर ब्रँडच्या तुलनेत मागे आहेत.
बजेट सेगमेंटमध्ये विकल्या जाणाऱ्या Maruti Suzuki च्या अनेक गाड्या असुरक्षित आहेत. क्रॅश टेस्ट रँकिंगमध्ये (Crash Test Rating) या गाड्यांना फार कमी रेटिंग देण्यात आलं आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, यानंतरही बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये मारुतीचा समावेश आहे. या गाड्यांसमोर टाटा आणि महिंद्राच्या 5 स्टार रेटिंग मिळालेल्या गाड्याही तग धरु शकल्या नाहीत. मारुतीच्या या कार नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घ्या...
मारुती अल्टो कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. फेब्रुवारी महिन्यात या कारच्या 18 हजार 114 युनिट्सची विक्री झाली आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत मात्र ही कार फार मागे आहेत. अल्टोला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी फक्त 2 स्टार देण्यात आले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तर या कारला शून्य रेटिंग मिळालं आहे.
मारुती स्विफ्ट आपल्या इंजिन आणि मायलेजमुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. पण भारतात विकल्या जाणाऱ्या असुरक्षित गाड्यांमध्ये हिचा समावेश आहे. गतवर्षी झालेल्या GNCAP क्रॅश टेस्टमध्ये नव्या जनरेशनच्या स्विफ्टला फक्त 1 स्टार देण्यात आला होता.
बजेट हॅचबॅक सेगमेंटमध्ये Maruti WagonR ला खूप पसंती दिली जाते. हे मॉडेल गेल्या अनेक काळापासून मार्केटमध्ये उपलब्ध असून चांगली विक्री होत आहे. पण कंपनीने या कारच्या सुरक्षेत जास्त सुधारणा केलेली नाही. मारुतीची ही सर्वाधिक विक्री होणारी कार सुरक्षेत फक्त 2 स्टार मिळवू शकली आहे.
कॉम्पॅक्ट सेदान Maruti Dzire ने बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही कार भारतात सर्वाधिक विक्री होणाऱी कॉम्पॅक्ट सेदान आहे. कंपनीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तब्बल 16 हजार युनिट्सची विक्री केली आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत मात्र हा कार फार मागे आहे. गतवर्षी झालेल्या सुरक्षा चाचणीत या कारला 2 स्टार देण्यात आले होते.
Maruti S-Presso चा लूक एका छोट्या एसयुव्हीसारखा आहे. कंपनी हॅचबॅक सेगमेंटमध्ये या कारची विक्री करत आहे. 2022 मध्ये ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये S-Presso ला ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी शून्य स्टार देण्यात आला होता. तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तर या कारला 2 स्टार रेटिंग देण्यात आलं होतं.