150 दिवसात कमवले 286 कोटी रुपये; 26 वर्षीय IIT ड्रॉपआऊटने असं केलं तरी काय?

Rahul Roy Riches Story: बीएससीचं शिक्षण घेण्यासाठी तो मुंबई आयआयटीमधून अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच बाहेर पडला, मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2023, 04:45 PM IST
150 दिवसात कमवले 286 कोटी रुपये; 26 वर्षीय IIT ड्रॉपआऊटने असं केलं तरी काय? title=
आयआयटीमधील अभ्यासक्रम अर्धात सोडून दिला

Rahul Roy Success Story: आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठीच एवढे कष्ट घ्यावे लागतात की इथं प्रवेश मिळणं हीच एक अचिव्हमेंट असते. मात्र इथं प्रवेश मिळालेलाही प्रत्येकजण यशस्वी होतोच असं नाही. अनेकजण मध्येच शिक्षण सोडून देतात. असे शिक्षण अर्ध्यात सोडून देणारे अयशस्वी ठरतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राहुल रायची (Rahul Rai) यशोगाथा वाचायलाच हवी. मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर राहुलने अचानक 2015 मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेण्याआधीच आयआयटीमधील शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. आता त्याने अचानक शिक्षण सोडण्यामागील कारण होतं आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याबद्दल राहुलला मिळालेली दुरदृष्टी.

शिक्षण सोडून काय केलं?

आपला कल हा इकनॉमिक्सकडे असल्याचं राहुलला जाणवं. त्याने युनायडेट स्टेट्स म्हणजेच अमेरिकेतील 'द वॉर्टन स्कूल'मध्ये बीएससी इन इकनॉमिक्सच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. राहुल 2019 मध्ये 'द वॉर्टन स्कूल'मधून उत्तीरण झालं. त्यानंतर त्याने अमेरिकेतील 'मॉर्गन स्टॅनली' या आर्थिक क्षेत्रातील बड्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये तो पुन्हा भारतात परतला. त्याने स्वत: काहीतरी सुरु करण्याच्या उद्देशाने 2 मित्रांना सोबत घेऊन एक कंपनी सुरु केली. राहुलची कंपनी ही क्रिप्टोकरन्सी फंडिंगचं काम करते. 

कसे पैसे कमवते ही कंपनी?

राहुलने 'वॉल स्ट्रीट' आणि 'मॉर्गन स्टेनली'मध्ये आर्थिक विषयांबद्दल घेतलेलं शिक्षण वापरुन कंपनीला क्रिप्टो करन्सीच्या क्षेत्रात नाव मिळवून देण्याचा या तिन्ही मित्रांचा प्रयत्न आहे. 'गामा पॉइण्ट कॅपिटल' असं राहुल आणि त्याच्या मित्रांच्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी डिजीटल असेट्स आणि ब्लॉकचेक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करुन व्यवहार करते आणि पैसा कमवते.

तो एक निर्णय अन् 150 दिवसांमध्ये कमवले 286 कोटी

क्रिप्टो करन्सी मार्केट खणखणीत कमाई करत असताना जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यवहार करायचे आणि आपल्या क्लायंट्सबरोबरच स्वत:ची पैसे कमवायचे या तत्वावर कंपनी काम करते. कंपनी सुरु केल्यानंतर या कंपनीची अशी काही घौडदौड सुरु होती की अवघ्या 5 महिन्यांमध्ये त्यांना एक ऑफर मिळाली जी त्यांना नाकारता आली नाही. 'ब्लॉकटॉवर कॅपिटल' कंपनीने 'गामा पॉइण्ट कॅपिटल' ही कंपनी 286 कोटी रुपयांना विकत घेतली. कंपनी विकण्याचा निर्णय कठीण होता मात्र 'ब्लॉकटॉवर कॅपिटल' इतकी संपत्ती कमवण्यासाठी अनेक वर्ष जातील असं या तिघांना जाणवलं आणि त्यांनी कंपन्यांच्या विलिनिकरणाला परवानगी दिली. म्हणजेच राहुल आणि त्याच्या मित्रांनी अवघ्या 150 दिवसांमध्ये 286 कोटी रुपये कमवले. विशेष म्हणजे राहुल केवळ 26 वर्षांचा आहे.

सध्या काय करतोय?

कोट्यधीश झाल्यानंतर राहुल 'ब्लॉकटॉवर कॅपिटल'अंतर्गत स्वतंत्र्य विभागाचं नेतृत्व करत आहे. तो या कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या 150 मिलियन अमेरिकी डॉलर्सची उलाढाल असणारा विभाग हाताळतोय. विशेष म्हणजे 2022 हे वर्ष क्रिप्टो जगतासाठी फारसं चांगलं राहिलं नाही तरीही राहुलने आपल्या कौशल्याने कंपनीला नफा मिळवून दिला.