नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांनी या फोनची प्री-बुकींग केली. मात्र, काहींना प्री-बुकींग करता आली नाहीये. तुम्हाला सुद्धा बुकींग करता आलेली नाहीये तर मग तुम्हाला आता आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण, रिलायन्स जिओने जिओफोनची बुकींग काही काळासाठी बंद केली आहे.
या संदर्भात जिओच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटलं आहे की, लाखो नागरिकांनी यापूर्वीच प्री-बुक केलं आहे. जिओफोनची प्री-बुकींग गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता सुरु झाली होती. त्यानंतर नागरिकांची बुकींगसाठी मोठी डिमांड केली आणि त्यामुळे वेबसाईटही काही वेळासाठी क्रॅश झाली होती.
आता जिओने बुकींग बंद केली असून पून्हा बुकींग कधी सुरु होणार यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, बुकींग लवकरच सुरु करण्यात येईल.
जिओ फोनची प्री-बुकींग करण्यासाठी ग्राहकांना सुरुवातीला ५०० रुपये द्यावे लागत आहेत. तर, इतर रक्कम फोन खरेदी करताना द्यावी लागणार आहे. ही १५०० रुपयांची रक्कम ग्राहकांना तीन वर्षांनी फोन परत केल्यावर परत मिळणार आहे.
अद्याप या फोनच्या फिचर्स संदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स लीक झाले होते.