मुंबई : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावापासून जगातील मोठ्यात मोठ्या कंपन्याही सुटलेल्या नाहीत. याचाच नकारात्मक परिणाम कंपनीवर, कंपनीच्या इमेजवर आणि कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होई नये, यासाठी कंपन्या आता खास काळजी घेताना दिसत आहेत. आपले कर्मचारी सोशल मीडियावर कंपनीच्या इमेजवर परिणाम करणारी वक्तव्य तर करत नाहीत ना? याकडे आता कित्येक कंपन्यांनी लक्ष देणं सुरू केलंय. यासाठी आता कंपन्यांनी सोशल मीडिया गाईडलाईन्स बनवणंही सुरू केलंय.
आत्तापर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांनी अशा प्रकारच्या गाईडलाईन्स जारी केल्यात. जर एखादा कर्मचारी या गाईडलाईन्स टाळताना दिसला तर त्याची नोकरीही जाऊ शकते.
फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीही लिहिताना, स्टेटस अपडेट करताना त्याचा परिणाम काय होईल, याकडे अनेक जणांचं लक्ष नसतं. अनेकदा अनेक गोष्टी केवळ मस्करी म्हणून लिहिल्या जातात... परंतु, त्या सर्वांनाच मजेशीर वाटतील असं नाही. अनेकदा कर्मचाऱ्यांची विचारसरणी ही कंपनीच्या विचारधारेच्या अगदी विरुद्ध असू शकते... याचा कंपनीच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गाईडलाईन्स बनवण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी घेतलाय आणि तो अंमलातही आणलाय.
नुकतंच, कोटक महिंद्र बँकेनंही केरळमध्ये आपल्या एका कर्मचाऱ्याला अशाच कारणामुळे नारळ दिल्याचं उदाहरण ताजं आहे.
एकाचं सोशल मीडियावरचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दुसऱ्यासाठी मात्र घातक ठरू शकतं.... अनेक असंवेदनशील कृतींना आणि विचारांना इथं खतपाणी मिळू शकतं. याची किंमत कंपनीला आणि कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चुकवावी लागू नये, यासाठी कंपन्यांनी सावध पावलं उचलली आहेत.