नवी दिल्ली : गुगल आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनलं आहे. गुगल आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणंही अनेकांना शक्य नाहीये.
गुगलमधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फिचर्सपैकी एक म्हणजे गुगल मॅप होय. बहुतांश लोक हे एखाद्या ठराविक ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. गुगल मॅचच्या सहाय्याने गुगल आपल्या युजर्सला सलग अपडेट्स करत असतो.
अज्ञात स्थळी तुम्ही रस्ता भटकलात तर गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही योग्य ठिकाणी पोहचू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा ८ ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही गुगल मॅप आणखीन चांगल्या प्रकारे वापरु शकता. इतकेच नाही तर, गुगल मॅपसोबत मिळून तुम्ही पैसेही कमण्याची संधी आहे.
हे मॅप तुम्ही नेटवर्क किंवा इंटरनेट नसतानाही वापरु शकता. तुमच्या फोनला ज्यावेळी वाय-फाय कनेक्ट होतं त्यावेळी तुमचं मॅप आपोआप अपडेट होण्यास सुरुवात होते.
गुगल मॅपवर तुम्ही तुमच्या घरचा पत्ता, ऑफिसचा पत्ता किंवा नातेवाईकांचा पत्ताही अॅड करु शकता. यामुळे तुम्ही वारंवार रस्ता चूकू शकत नाही. यामुळे नेव्हिगेशनमध्येही खूप मदत होते.
जर तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे आणि त्याला तुमचं लोकेशन शोधण्यात अडथळा येत आहे. तर तुम्ही त्याच्यासोबत आपलं लोकेशन शेअर करु शकता. याच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहचू शकतो.
जर तुम्ही आपल्या आवडत्या दुकानांत, मॉल्समध्ये वारंवार जाता. तर, तुम्ही ही ठिकाणं आपल्या मॅपवर सेव्ह करु शकता. यामुळे तुम्हाला नेव्हिगेशनमध्ये कुठलाच अडथळा येत नाही.
तुमचा प्रवास सुखकर करण्यासाठी तुम्ही या मॅपचा वापर करु शकता. या मॅपच्या मदतीने तुम्ही ट्रेन, बस तसेच प्रवासासाठीच्या इतर माध्यमांची वेळ आणि येण्या-जाण्याचं ठिकाण तपासू शकता.
ज्यावेळी तुम्ही नेव्हिगेशनचा वापर करता त्यावेळी दोन्ही हातांचा वापर करत झुम करणं सोपं नसतं. त्यासाठी तुम्ही डबल टॅप करुन झुम करु शकता.
जर तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरून आला आहात आणि त्याच ठिकाणी तुम्हाला पुन्हा जायचं आहे मात्र, रस्ता लक्षात नाहीये? तर गुगल मॅप तुम्हाला रस्ता शोधण्यास मदत करेल.
जर तुम्ही गुगल मॅप आणखीन चांगलं बनविण्यासाठी मदत कराल तर त्याच्या बदल्यात गुगल तुम्हाला पैसे देतं. यासाठी तुम्हाला तुमच्या आसपासच्या जागा, लोकेशन गुगल मॅपवर योग्य पद्धतीने अॅड करायच्या आहेत.