जितेंद्र शिंगाडे, नागपूर : टिक-टॉकचे वेड दिवसांदिवस वाढत आहे. तडिपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगाराने चक्क पोलिसांच्या गाडीत बसून टिकटॉक व्हिडिओ शूट केला. नागपुरातला हा प्रकार समोर आला आहे. हा गुन्हेगार इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे.
सय्यद मोबिन असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. हा सर्व प्रकार शहरातील कोराडी भागात घडला. येथील पोलीस स्टेशन परिसरात पोलीस व्हॅन ऊभी होती. या गाडीत जाऊन मोबीनने टिक-टॉकच्या साहाय्याने व्हिडिओ तयार केला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्याने सर्व प्रकार ऊघडकीस आला. शूट केलेल्या व्हिडिओमध्ये 'केजीएफ' या हिंदी सिनेमातील डायलॉग आहेत. त्याने शेअर केलेल्या व्हिडियोमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मोबिन हा नागपुरातील चामा गँगचा हा म्होरक्या आहे. मोबिनवर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच इतर आरोपांमध्ये तो मुख्य गुन्हेगार देखील आहे. मोबिन वर वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांसह हत्येच्या प्रयत्नाचे ही गुन्हे दाखल आहे.
मोबिनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमूळे त्याला २ महिन्याआधी तडीपारीचे आदेश दिले होते. डीसीपीने तडीपारीचे आदेश दिले होते. असे असताना देखील एखादा गुन्हेगार आपल्या पोलिस हद्दीत येऊन पोलिसांच्या गाडीत व्हिडीओ काढतो. त्यामुळे नागपूरातील कायदे सुव्यवस्था किती ढिम्म आहे, हे लक्षात येते.
तडीपारीच्या आदेशानंतर देखील मोबिनवर कारवाई का केली गेली नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.