अमर काणे, झी मीडिया, नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील गदारोळामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी त्यांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती.
तुकाराम मुंढे यांनी माझे प्रसुती हक्क नाकारले. तसेच मला नोकरीवरुन काढून टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. या सगळ्याच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांनी आपल्याला अपमानजनक वागणूक दिल्याचे आणि आपला मानसिक छळ केल्याचे भानुप्रिया ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने तुकाराम मुंढे यांना नोटीस पाठवली आहे.
...अन् संतापलेले तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले
काही दिवसांपूर्वीच नागपूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली होती. हा वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली होती. मुंढे यांनी अवैध, बेकायदेशीर, भ्रष्ट आणि घटनाबाह्य कृती केल्याचा गंभीर आरोप नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात केला होता. नागपूर महापालिका आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवैधरित्या 'नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'चं सीईओपद बळकावल्याचा गंभीर आरोप गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले होे.