अयोध्येत हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांनाही जागा द्यावी- रामदास आठवले

आठवलेंचा सरकारसमोर नवा प्रस्ताव

Updated: Nov 3, 2018, 11:47 AM IST
अयोध्येत हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांनाही जागा द्यावी- रामदास आठवले title=

वर्धा: सध्या देशभरात राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राम मंदिराच फैसला अजूनही झालेला नाही. मात्र, संघ आणि भाजपच्या नेत्यांकडून राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी केली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक नवा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे. अयोध्येत मंदिर किंवा मशीद बांधण्याऐवजी याठिकाणी हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांना विभागून जागा द्यावी. त्याठिकाणी हिंदूंनी मंदिर बांधावे, मुस्लिमांनी विद्यापीठ उभारावे तर बौद्ध समाजही आपले मंदिर बांधेल, असे आठवले यांनी वर्धा येथील पत्रकार परिषदेत म्हटले. 

राम मंदिराचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काही लोकांच्या मते प्राचीनकाळी याठिकाणी बुद्ध मंदिर होते. ते पाडून राम मंदिर बांधण्यात आले. यानंतर तेथे मशीद बांधण्यात आली. मात्र, आता यावर तोडगा काढायचा असेल तर हिंदू धर्म मोठा असल्याने त्यांना जास्त जागा द्यावी. काही भाग मुस्लिमांना द्यावा, काही भाग आम्हाला द्यावा. जेणेकरून यावर तोडगा निघेल, असे आठवलेंनी सांगितले.