'सुलतान'चा भाव पाहा आणि शांत बसा!

सुलतान हा शुभ्र पांढऱ्या रंगाचा अश्व असून, त्याला बघितल्यावर कोणीही अश्वप्रेमी लगेचच त्याच्या प्रेमात पडतो.

Updated: Dec 19, 2018, 09:43 AM IST
'सुलतान'चा भाव पाहा आणि शांत बसा! title=

नंदूरबार - नंदूरबारमधील अश्व बाजार आता भारतात प्रसिद्ध झाला आहे. अनेक अश्वप्रेमी दरवर्षी या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या घोड्यांची माहिती घेतात आणि शक्य झाल्यास खरेदीही करतात. यंदाच्या बाजारात चर्चा आहे ती सुलतानची. सुलतानची किंमत आहे तब्बल एक कोटी ११ लाख रुपये. 

बाजारात येणाऱ्या विविध अश्वांची किंमत त्यांची उंची, चाल आणि रंग यावरून निश्चित केली जाते. सुलतान हा शुभ्र पांढऱ्या रंगाचा अश्व असून, त्याला बघितल्यावर कोणीही अश्वप्रेमी लगेचच त्याच्या प्रेमात पडतो, हे अगदी निश्चित. सुलतानचा रुबाबही त्याला साजेसाच आहे. त्याच्या सेवेसाठी चार जण २४ तास कार्यरत असतात. त्याला काय हवं नको, याची संपूर्ण काळजी हे चौघे घेत असतात. त्याला आवडणारे खाद्यही त्याला दिले जाते. सुलतानाच्या खानपानाचीही विशेष काळजी घेतली जाते.

सुलताननंतर यंदा चर्चा आहे ती चेतकची. चेतक अश्वाने आतापर्यंत सहा वेळा देशातील विविध घोडेस्वारी स्पर्धेत विजय मिळवला आहे. चेतक संपूर्णपणे काळ्या रंगाचा असून त्याच्या डोक्यावर पांढरा पट्टा आहे. त्यामुळे त्याचाही रबाब भलताच आहे. 

सारंगखेड्याच्या अश्व बाजारात दरवर्षी अनेक जण महागडे आणि रुबाबदार अश्व पाहण्यासाठी हमखास येतात. आता दत्त जयंतीपासून अजून काही रुबाबदार अश्व बाजारात येणार असल्याची चर्चा सध्या आहे.