'माझ्या दिसण्यावर जाऊ नका, फटका कधी मारला समजणारही नाही'

चंद्रकांत पाटील यांची कोथरूड मतदारसंघातील उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे.

Updated: Oct 11, 2019, 02:58 PM IST
'माझ्या दिसण्यावर जाऊ नका, फटका कधी मारला समजणारही नाही' title=

कोल्हापूर: शरद पवार यांनी अजून मला पुरते ओळखलेले नाही. मी कधी फटका लगावेन, हे त्यांना समजणारदेखील नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. ते शुक्रवारी कोल्हापूरात बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटले की, तुम्ही अजून पाटलांना ओळखले नाहीत. माझ्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नसतात. पण मी कसा फटका लगावतो, हे समजतही नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच त्यांनी मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवले आहे, या भ्रमात राहू नये, असेही पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील यांची कोथरूड मतदारसंघातील उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर ब्राह्मण विरुद्ध मराठा असा सुप्त संघर्ष होण्याची भीती आहे. 

मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

याशिवाय, विरोधकांनी कोथरूडमध्ये एकमताने मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन दाखवावे, असे वक्तव्य मध्यंतरी शरद पवार यांनी केले होते. यानंतर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु झाली होती. अखेर पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कोथरूडमधून त्यांना रिंगणात उतरवण्यात आले. 

...म्हणून चंद्रकांत पाटलांना पुण्यातून मिळाली उमेदवारी!

तर चंद्रकांत पाटील यांनीही आपल्याला पराजय हा शब्दच माहिती नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण निवडणुकीत हमखास विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.