'चंद्रकांतदादा एवढं लक्षात ठेवा, मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो'

केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही.

Updated: Jul 27, 2020, 12:27 PM IST
'चंद्रकांतदादा एवढं लक्षात ठेवा, मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो' title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. त्यांनी सोमवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी, असे क्षीरसागर यांनी म्हटले.

'आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवून दिलंय'

तसेच चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला बाईट दिला का, हे सांगावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.

ये दोस्ती.... हम नही तोडेंगे... संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. कोरोनाच्या काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी आगामी काळात भाजपकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच आपल्यावर करण्यात येणाऱ्या वैयक्तिक टीकेलाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. कोणावरही केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाऊ नये. कुणी चंपा म्हणतं, कुणी कुत्रा म्हणतं. त्यामुळे आता आक्रमक व्हावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.