इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरूंगात ३९९ मच्छिमारांसहित एकूण ४५७ भारतीय कैदी बंद आहेत. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने भारताकडे या कैद्यांच्या नावाची प्रत दिली.
२१ मे २००८ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या 'काऊंसिलर एक्सेस समझोत्या'तील अटींनुसार ही कैद्यांची सुची असल्याचे पाकतर्फे सांगण्यात आले.
या करारानुसार दोन्ही देशांनी आपआपल्या देशात कैद असलेल्या कैद्यांची सूची वर्षातून दोन वेळा देणे अपेक्षित आहे.
ही यादी १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी एकमेकांना दिली जाते.
दिलेल्या सुचीनुसार, पाकिस्तानने आज इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायोगला तिथे बंद असलेल्या ४५७ भारतीय कैद्यांची सूची दिली आहे.
यामध्ये ५८ सामान्य कैदी ३९९ मच्छिमार आहेत. ८ जानेवारीला १४६ मच्छिमारांना सोडण्यात येणार असल्याचेही पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले.
पाकिस्तान विदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतदेखील आपल्याकडे कैद असलेल्या पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील उच्चायोगकडे सुपूर्द करेल.