लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. थायलंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला नाखोन रत्चासिमा या ईशान्येकडील थाई प्रांतातील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला.
Bangkok Post च्या वृत्तानुसार माजी लष्करी जवान आणि पॅरालम्पिक खेळाडू 29 वर्षीय Chaturong Suksuk हा 44 वर्षीय Kanchana Pachunthuek सह गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. शनिवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर जेवणाचाही कार्यक्रम झाला होता. दरम्यान लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेव अर्ध्यातून निघून गेला होता. नंतर तो हातात पिस्तूल घेऊन मंडपात पोहोचला.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खासगी गोष्टींवरुन दोघांमध्ये वाद झाला. यानंतर Chaturong गाडीकडे चालत गेला आणि तेथून पिस्तूल घेऊन आला. यानंतर त्याने गोळीबार केला.
नवरदेवाने पत्नीसह तिची 62 वर्षीय आई आणि 38 वर्षी बहिणीला गोळ्या घातल्या. यानंतर त्याने दोन पाहुण्यांवरही गोळीबार केला. त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यामधील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. गोळीबारानंतर नवरदेवाने स्वत:वरही गोळी झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसं जप्त केली आहेत.
पोलीस प्रवक्त्याने बीसीसीशी बोलताना सांगितलं आहे की, नवरदेव मद्यधुंद अवस्थेत होता. पण त्याने नेमकं का केलं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस तपास करत असून, पुरावे गोळा करत आहेत.
Straits Times नुसार, नवरदेवाला फार असुरक्षित वाटत असल्याने त्यांच्यात वाद सुरु झाला होता. आपण अपंग असल्याने पत्नी दुसऱ्यासाठी सोडून जाईल अशी भीती त्याला वाटत होती.
नवरदेव हा जलतरणपटू होता, ज्याने 2022 मध्ये इंडोनेशिया आणि कंबोडिया येथे झालेल्या ASEAN पॅरा गेम्समध्ये दोन रौप्यपदकं जिंकली होती. स्थानिक मीडियानुसार तो थाई सैन्याचा रेंजर होता आणि सीमेवर गस्तीवर असताना त्याचा उजवा पाय गमावला होता.
थायलंडमध्ये बंदूक हिंसा सामान्य आहे, जिथे बंदुका कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही पद्धतीने सहज उपलब्ध आहेत. सामूहिक गोळीबार ही तिथे फार दुर्मिळ बाब आहे.