Pakistan Family Unique Record: कुटुंब म्हटलं की, जितक्या व्यक्ती तितके स्वभाव असतात. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे स्वभाव, सवयी असणारे सदस्य असतात. अनेकदा काही कुटुंबांमधील सर्व सदस्य एकसारखेही असतात. पण कोणतंही कुटुंब असलं तरी त्यात एक गोष्ट मात्र कधीही सारखी नसते आणि ती म्हणजे जन्मतारीख. काही कुटुंबात दोन सदस्यांचा एकाच दिवशी वाढदिवस असू शकतो. पण संपूर्ण कुटुंबाचीच जन्मतारीख एक असेल तर...हे कसं काय शक्य आहे असा विचार तुम्ही करत असाल ना. पण असं एक कुटुंब आहे आणि त्याची दखल थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
पाकिस्तानच्या लरकाना येथे राहणाऱ्या कुटुंबाच्या नावे एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे. 9 सदस्यांच्या या कुटुंबात एक गोष्ट साऱखीच आहे, ती म्हणजे त्यांची जन्मतारीख. कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म 1 ऑगस्टला झाला आहे. संपूर्ण कुटुंब एकाच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतं.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात आमीर अली, त्यांची पत्नी खुदेजा यांच्यासह त्यांची 7 मुलं आहेत. 7 मुलांमधील दोन मुली ससुई आणि सपना जुळ्या आहेत. तर आमीर-अंबर आणि अम्मार-अहमर हेदेखील जुळी भावंडं आहेत. याशिवाय सिंधू नावाची एक मुलगी आहे. या सर्वांचं वय 19 ते 30 दरम्यान आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, सात मुलांसह त्यांच्या आई-वडिलांचाही जन्मदिवस 1 ऑगस्ट आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष वेगवेगळं आहे, पण महिना आणि तारीख सारखीच आहे. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. कोणत्याही कुटुंबात इतक्या लोकांची जन्मतारीख सारखी नाही. हा रेकॉर्ड आधी कमिंस कुटुंबातील (अमेरिका) पाच मुलांच्या नावे होता. यांचं जन्म 1952 आणि 1966 दरम्यान 20 फेब्रुवारीला झाला होता.
आमीर आणि खुदेजा यांच्यासाठी 1 ऑगस्ट तारीख वेगळ्या कारणासाठीही खास आहे. याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही असतो. आपल्या मोठ्या मुलीच्या जन्माच्या बरोबर एक वर्ष आधी त्यांनी 1991 रोजी आपल्या वाढदिवशी लग्न केलं होतं. 1 ऑगस्ट 1992 रोजी सिंधूचा जन्म झाला. सिंधू त्यांची सर्वात मोठी मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर आमीर आणि खुदेजा आश्चर्यचकित आणि आनंदी अशा दोन्ही भावनांचा सामना करत होते. यानंतर त्यांची सर्व मुलं 1 ऑगस्टलाच जन्माला आली. हा देवाचा आशीर्वाद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
रिपोर्टनुसार, प्रत्येक मूल सामान्य प्रकारेच जन्माला आलं आहे. खुदेजा यांची डिलिव्हरीही वेळेत झाली होती. त्यांच्यावर कधीही ऑपरेशन करण्याची वेळ आली नाही. सर्वकाही सामान्य होतं.