Pet Dog Attack: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात (Dog Attack) एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच हैदराबादमध्ये (Hyderabad) घडली आहे. या घटनेचं अंगावर काटा आणणारे CCTV फुटेज व्हायरल झाले आहे. असाच प्रकारची घटना अमेरिकेत घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यातुन एक चिमुरडी थोडक्यात बचावली आहे. भटक्या नाही तर पाळीव कुत्र्यानेच तिच्यावर हल्ला केला आहे. पिटबुल जातीच्या कुत्र्याने (Pitbul Dog) 6 वर्षाच्या मुलीचा जबडा तोंडात पकडला. यानंतर तिची कशी बशी सुटका झाली. 1000 टाके घालून डॉक्टरांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत या चिमुकलीचा जीव वाचवला आहे.
अमेरिकेतील मेन प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी याबबातचे वृत्त दिले आहे. मेन प्रांतातील रहिवासी असलेले डोरोथी नॉर्टन यांची मुलगी 18 फेब्रुवारी रोजी तिच्या मित्राच्या घरी खेळायला गेली होती. यावेळी तिच्या मित्राच्या घरी असलेल्या पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला.
चिमुकली आणि तिचा मित्र एका खोलीत खेळत होते. यानंतर त्यांनी पत्ते खेळायचे असे ठरवले. तिचा मित्र पत्ते आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. यावेळी त्याच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याने या सहा वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. कुत्र्याने या मुलीचा जबडाच आपल्या तोंडात पकडला. यामुळे मुलीला मदतीसाठी आरडा ओरडा देखील करता आला नाही.
तिचा मित्र परत आल्यावर त्याने कुत्र्याच्या तोंडात या मुलीचा जबडा पाहिला. मदतीसाठी धाव घेत त्याने तात्काळ मुलीला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. मात्र, मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिचे तोंड रक्तबंबाळ झाले होते.
मुलाच्या कुटुंबियांनी तात्काळ या मुलीला रुग्णालयात दाखल केले आणि तिच्या आई वडिलांना या घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी तात्काळ या मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या मुलीच्या चेहऱ्यावर तब्बल 1000 टाके पडले आहेत. 1000 टाके घालून डॉक्टरांनी या मुलीचे प्राण वाचवले आहेत.
कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या मुलीवर तब्बल 11 तास शस्त्रक्रिया सुरु होती. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलीचे गोड हसू हरवले आहे. टाक्यांमुळे या मुलीच्या चेहऱ्यावर अनेक व्रण उमटले आहेत. यामुळे या मुलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य कधीच पहायला मिळणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. श्त्रक्रियेनंतर य मुलीला अनेक तास बेशुद्ध ठेवले जाणार आहे. कारण तिच्या चेहऱ्य़ावरील टाके ओले आहेत. अशा अवस्थेत मुलीने टाक्यांना हात लावल्यास इन्फेकशनचा धोका आहे. म्हणून तिला बेशुद्ध ठेवले जाणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.