Ajab Gajab News: आयुष्यात मोठं व्हाययं असेल तर मेहनतीबरोबर नशीबाचीही साथ असावी लागते असं म्हटलं जातं. अनेकदा आपण प्रयत्न करत राहतो, कठोर मेहनतीची जोडही देतो. पण काही केल्या यश हाती लागत नाही. पण नशिबाची साथ असेल तर अनेक गोष्टी एकदम जुळून येतात. एखादं न होणारं काम अचानक होतं किंवा लॉटरी (Lottery) लागून रातोरात मालामाल होतात. अशी अनेक उदाहरणं आपण सोशल मीडियावर (Social Media) पाहात असतो. पण काही जण अशीही असतात ज्यांना हाता-तोंडाशी आलेला पैसा संधी असूनही मिळत नाही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
महिलेने एक कोटी गमावले
ब्रिटनमध्ये राहाणाऱ्या एका महिलेला नशिबाने धोका दिला. या महिलेची एक कोटी रुपये जिंकण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली. या महिलेने स्नॅक्स पाकिटात सापडलेला हार्ट शेप वेफर्स खाल्ला. पण यानंतर तिला कळलं त्या हार्टशेप वेफर्सची किंमत तब्बल एक कोटी रुपये इतकी होती.
या महिलेने स्नॅकचं एक पाकिट विकत घेतलं होतं. या पाकिटात महिलेला हार्टशेफ वेफर्स (Heart Shape Chips) सापडला. पण हा एक वेफर्स 1 कोटी रुपये जिंकून देईल याचा अंदाज महिलेला नव्हता. पण जेव्हा याबाबत तिला कळलं तेव्हा तिच्याकडे पश्चाताप करण्यापलिकडे काहीच उरलं नव्हतं. या महिलेचं नाव डॉन सॅगर असं असून ती 40 वर्षांची आहे. ब्रिटनमधल्या एका सुपरमार्केटमध्ये (Super Market) काम करते.
15 फेब्रुवारी सॅगर नेहमीप्रमाणे आपल्या कामावर आली यावेळी तीने आपल्या दोन मुलांनाही आणलं होतं. कामावर लवकर पोहोचल्याने तिच्याकडे थोडासा मोकळा वेळ होता. सुपरमार्केटमध्ये फिरत असताना सॅगरच्या दोन मुलांनी चिप्स खाण्यासाठी हट्ट केला. त्यामुळे सॅगरने 'रेड सॉल्टेड' नावाच्या वेफर्सची तीन पाकिटं विकत घेतली. यातल्या एका पाकिटातून सॅगर वेफर्स खात असताना नेहमीपेक्षा वेगळा शेप असलेला वेफर्स तिच्या हाती लागला.
या वेफर्सचा शेप हार्ट सारखा होता. सहज म्हणून सॅगरने त्या हार्टशेप वेफर्सचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यावेळी तिला काही लोकांनी याबाबतची माहिती दिली. 'रेड सॉल्टेड' चिप्स बनवणाऱ्या वॉकर्स कंपनीने हार्टशेप वेफर्स आणून देणाऱ्या ग्राहकाला 99 लाख 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. सॅगरला जेव्हा याबाबतची माहिती मिळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हार्टशेप वेफर्सचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानेतर सॅगरने तो वेफर्स खाऊन टाकला होता.
कंपनीची ऑफर 20 मार्चपर्यंत होती, पण सॅगरला एका चुकीमुळे लाखो रुपयांवर पाणी सोडावं लागलं होतं.