मांजरीला घराबाहेर काढल्याने पत्नीने मागितला घटस्फोट, म्हणाली "तो माझा बाप आहे", पतीही पडला बुचकळ्यात

पतीने पाळीव मांजरीला (Cat) घराबाहेर काढल्याने पत्नीने थेट कोर्ट गाठलं असून घटस्फोटाची (Divorce) मागणी केली आहे. या एका गोष्टीवरुन पत्नी घटस्फोट मागत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.     

शिवराज यादव | Updated: Apr 15, 2023, 01:56 PM IST
मांजरीला घराबाहेर काढल्याने पत्नीने मागितला घटस्फोट, म्हणाली "तो माझा बाप आहे", पतीही पडला बुचकळ्यात title=
(Representative Photo: Reuters)

Viral News: पती आणि पत्नीमधील वाद अनेकदा टोकापर्यंत पोहोचतात आणि मग हे भांडण घटस्फोटापर्यंत (Divorce) जातं. कधी विवाहबाह्य संबंध तर कधी संपत्तीच्या मुद्द्यावरुन पती-पत्नी यांच्यातील भांडणं टोक गाठतात. पण एका पाळीव प्राण्यामुळे पत्नी घटस्फोटाची मागणी करत असल्याचं तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण खरंच असा एक प्रकार समोर आला असून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पतीने पाळीव प्राण्याला घराबाहेर काढल्याने पत्नीने थेट कोर्टात धाव घेत घटस्फोटाची मागणी केली आहे. महिला बाहेर फिरण्यासाठी गेली असता पतीने मांजरीला घऱाबाहेर काढलं होतं. 

महिलेने वडिलांच्या निधनानंतर बेंजी नावाच्या मांजरीला पाळण्यासाठी घेतं होतं. ही मांजर म्हणजे आपल्या वडिलांचा पुनर्जन्म असल्याचं तिचं म्हणणं आहे. हळूहळू तिचा या मांजरीवर जीव जडला होता. पण पतीने या मांजरीला घऱाबाहेर काढल्याने महिला संतापली आणि आता घटस्फोट देण्याची तयारी करत आहे. 

महिलेने रेडिटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे की, मी लहान असताना या मांजरीची सुटका केली होती. त्यावेळी ती माझ्या छोट्या हातातही मावत होती. हे ऐकून काही लोकांना आश्चर्य वाटू शकतं, पण ही मांजर माझ्या वडिलांचा पुनर्जन्म आहे यावर माझा विश्वास आहे. मी जेव्हा कधी तिचे डोळे पाहते, तेव्हा मला ती मांजरीपेक्षा जास्त असल्याची भावना येते. 

पुढे तिने म्हटलं आहे की, "माझ्या पतीला हे अजब आणि आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं वाटतं. माजंरीसह माझे संबंध पाहून आपल्याला भीती वाटते आणि असह्य होतं असं त्याचं म्हणणं आहे. पण या मांजरीत माझ्या वडिलांची आत्मा आहे यावर माझा विश्वास आहे. मी आपली आई आणि बहिणीसोबत सुट्टीवरुन परतली असता पतीने आपण मांजरीला सहकाऱ्याला देऊन टाकलं असल्याचं सांगितलं. मी फोन करुन त्याच्या मित्राकडे मांजर मागितली असता तो नकार देऊ लागला. तुझ्याच पतीने मला मांजर दिली असून, मी परत देणार नाही असं तो सांगत होता. ही माझी मांजर असताना पतीला असं करण्याचा काही अधिकार नव्हता. मी फार अस्वस्थ आहे. माझी बेंजी अशी कधी राहिलेली नाही. तीदेखील दु:खी असेल". 

मी पोलीस तक्रार करणार होते. नंतर माझ्या पतीने सहकाऱ्याला याबद्दल सांगितलं असता त्याने मांजर आपल्याकडे नसून एका ठिकाणी सोडून दिली असल्याचं सांगितलं. मी नंतर ती जागा शोधली आणि मांजरीला परत घेऊन आली असंही महिलेने सांगितलं आहे. महिलेच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.