अफगाणिस्तानात तालिबान विरोधात बंड, 3 जिल्हे तालिबानच्या कब्जातून मुक्त

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती पळून गेल्यानंतर आता जनता स्वतःच रस्त्यावर उतरली आहे

Updated: Aug 20, 2021, 10:28 PM IST
अफगाणिस्तानात तालिबान विरोधात बंड, 3 जिल्हे तालिबानच्या कब्जातून मुक्त  title=

अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तानचा (Afghanistan) बहुतांश भाग काबीज केला आहे. तालिबान्यांचा (Taliban) क्रुर चेहरा हळूहळू समोर येत असून तिथे परिस्थिती बिकट बनली आहे. पण अशा परिस्थितीतही अफागाणिस्तानमध्ये काही असे प्रांत आहेत जिथे तालिबान्यांसमोर नतमस्तक होण्यास  लोक तयार नाहीत. 

अफगाण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तिथल्या लोकांनी तालिबान्यांविरोधात लढा सुरु केला आहे. तालिबानविरोधी कमांडर अब्दुल हमीद दादगर यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या बागलान प्रांतातील (Baghlan Province) 3 जिल्हे तालिबानच्या ताब्यातून मुक्त झाले आहेत. ही घटना तालिबान आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानली जात आहे.

पाकिस्तानचं समर्थन आणि शस्त्रांच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानचा बहुतांश भाग काबीज करण्यात यशस्वी झाला आहे. त्यांनी 15 ऑगस्टला राजधानी काबूल काबीज केलं. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani) देश सोडून आपल्या कुटुंबासह संयुक्त अरब अमिरातीला गेले. अफगाणिस्तानचे राजकारणी, अधिकारी आणि लष्करी कमांडर मोठ्या संख्येने त्याच्यासोबत यूएईला पोहोचले आहेत.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आणि राष्ट्रपती पळून गेल्यानंतर आता जनता स्वतःच रस्त्यावर उतरली आहे. अफगाणिस्तानच्या अनेक भागात मिरवणुका काढणं आणि राष्ट्रध्वजासह घोषणाबाजी करण्याच्या घटना घडत आहेत. तालिबानकडून गोळीबार होण्याची शक्यता असतानाही लोकांना भीती वाटत नाही. 

अशा परिस्थितीत बागलान प्रांतातील 3 जिल्ह्यांतून तालिबानच्या हातातून सुटणं हे त्याच्यासाठी मोठं आव्हान मानलं जात आहे. येत्या काळात तालिबानविरोधातील हे युद्ध आणखी तीव्र होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.