Covid-19 : 'या' देशाला शाळा सुरू करणं पडलं महागात; २५० विद्यार्थी संक्रमीत

कोरोनाबाधितांच्या यादीत देशाचा समावेश 

Updated: Jun 5, 2020, 11:26 PM IST
Covid-19 : 'या' देशाला शाळा सुरू करणं पडलं महागात; २५० विद्यार्थी संक्रमीत

मुंबई : इस्त्राइल हा जगातील निवडक देशांपैकी एक आहे जिथे कोरोना व्हायरस नियंत्रणमध्ये आहे. याच कारणामुळे इस्त्राइल सरकारने मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि हाच निर्णय या देशाला सर्वात महागात पडला आहे. शाळा सुरू होताच देशातील २६१ विद्यार्थी आणि शाळेचा स्टाफ कोरोनाबाधित झाले. यानंतर इस्त्राइल सरकारला बॅक फूटवर जावं लागलं. 

इस्त्राइलमध्ये मार्च महिन्यात कोविड-१९ चे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले. याच दरम्यान इस्त्राइल सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ३० एप्रिल रोजी १५,९४६ कोरोनाबाधितांचा आकडा होता. त्यापुढील पंधरा दिवसात हा आकडा अगदी ६०० रूग्णांवर पोहोचला. याच उत्साहाच्याभरात सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

NPR च्या माहितीनुसार इस्त्राइल शाळेतील २६१ विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा १७,३७७ इतका आहे. 

इस्त्राइलमध्ये अचानक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शाळा अनिश्चित काळाकरता बंद ठेवल्या आहेत. जोपर्यंत शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी एक जणही कोरोनाबाधित असेल तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही. शाळेत कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास ६८०० विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. 

इस्त्राइलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत जगभरात इस्त्राइलचा ४२ वा क्रमांक आहे. देशात आतापर्यंत १४,९३३ लोकांना कोरोनाची लागण झाली होती मात्र त्यांची तब्बेत ठिक झाली आहे. आता २१४५ कोरोनाच्या ऍक्टिव केस आहेत.