अल कायदाने केलं तालिबानचं अभिनंदन, म्हणाले आता 'काश्मिर मुक्त करा'

अल-कायदाने तालिबानला शुभेच्छाचा संदेश पाठवला असून यात अमिरिकेला पराभूत करणाऱ्यांचं कौतुक करतो असं म्हटलं आहे

Updated: Sep 1, 2021, 08:10 PM IST
अल कायदाने केलं तालिबानचं अभिनंदन, म्हणाले आता 'काश्मिर मुक्त करा' title=

मुंबई : अफगाणिस्तान (Afghanistan) आता पूर्णपणे तालिबानच्या (Taliban) ताब्यात आलं आहे आणि अमेरिकन लष्करानेही अफगाणिस्तानमधून माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अल-कायदा (al-qaeda) या दहशतवादी संघटनेने तालिबानचं अभिनंदन केलं आहे. अल-कायदाने काश्मीर (Kashmir) आणि इतर कथित इस्लामिक प्रदेशांना 'इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून' मुक्त करण्याचं आवाहन केलं आहे.

तालिबानने पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच अल कायदाने तालिबानला अभिनंदनाचा संदेश पाठवला. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीकडे अल-कायदा मोठा विजय म्हणून पाहत आहे. या संघटनेने पॅलेस्टाईन, काश्मीर, लेवांत, सोमालिया आणि येमेन मुक्त करण्याचंही म्हटलं आहे.

काय आहे अलकायदाचा संदेश? 

अफगाणिस्तानमध्ये अल्लाहने मिळवून दिलेल्या विजयाबद्दल इस्लामिक जगताचं अभिनंदन’, लेवंत, सोमालिया, काश्मीर आणि अन्य इस्लामिक प्रदेशही शत्रूंच्या तावडीतून सोडवावा, जगभरामध्ये मुस्लीम कैद्यांना स्वातंत्र्य मिळू देत,' असा उल्लेख या अभिनंदनाच्या संदेशात म्हटलं आहे. 

या संदेशात पुढे लिहिलं आहे 'आम्ही त्या सर्वशक्तिमानाची स्तुती करतो ज्याने शक्तीशाली अमेरिकेला लाजवलं आणि पराभूत केलं. अमेरिकेच्या पाठीचा कणा मोडला, त्यांची जागतिक प्रतिमा डागाळली आणि अफगाणिस्तानच्या इस्लामिक भूमीतून हाकललं यासाठी आम्ही सर्वशक्तिमानाचं कौतुक करतो.

अफगाणिस्तानची भूमी इस्लामसाठी नेहमीच अजिंक्य किल्ला राहिली आहे. अमेरिकेच्या पराभवासह, अफगाणिस्तानने दोन शतकांच्या कालावधीत साम्राज्यवादी शक्तींना तीन वेळा यशस्वीरित्या पराभूत केले आहे. अमेरिकेचा पराभव जगभरातील छळलेल्या लोकांना प्रेरणा देणारा आहे.

अल कायदाने पुढे आपल्या संदेशात लिहिले आहे की या सर्व घडामोडींनी हे सिद्ध केले आहे की जिहादद्वारेच विजय मिळवता येतो. पुढील संघर्षासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तानात अमेरिका आणि नाटोच्या पराभवामुळे पाश्चात्य वर्चस्व आणि इस्लामिक भूमीवरील लष्करी कब्जाच्या अंधकारमय युगाच्या समाप्तीची सुरुवात झाली आहे.

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूल काबीज केलं. तेव्हापासून विश्लेषक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तालिबानचा विजय दक्षिण आशियातील दहशतवादी गटांसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो आणि सुरक्षा यंत्रणांसमोर बरीच आव्हाने निर्माण करू शकतो.