इटानगर : अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग नदीचं पाणी काळं होतयं.
चीन सियांग नदीवर प्रचंड बांधकाम करत असल्याची भीती व्यक्त होतेय. सियांग ही ब्रम्हपुत्रेची सर्वात मोठी उपनदी आहे. संबंधित यंत्रणांना सियांग नदीचं पाणी गूढपणे काळं होत असल्याचं लक्षात आलंय.
काँग्रेसचे खासदार, निनाँग एरींग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं लक्ष वेधण्यासाठी तसंच तात्काळ कारवाईसाठी त्यांना पत्र लिहिलंय. निनाँग एरींग यांनी लिहिलंय कि नदीचं पाणी काळं, गढूळ आणि प्रदूषित झालंय. यामुळं नदीतली जैवविविधता नष्ट झाली आहे.
सिमेंटसारख्या घट्ट पदार्थामुळं नदीचं पाणी वापरण्यायोग्य राहिलेलं नाही. नक्कीच चीन काहीतरी मोठं बांधकाम करत असला पाहीजे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची तपासणी झाली पाहीजे. चीन सियांग नदीत नक्कीच काहीतरी करतोय, असंही निनाँग एरींग यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
महिनाभरापूर्वीच चीनी अभियंते ब्रम्हपुत्रेवर १००० किमी लांबीचा बोगदा बांधण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली होती. या बोगद्याद्वारे ब्रम्हपुत्रेचं पाणी तिबेटमधून चीनच्या झिनजिआंग प्रांताकडे वळविण्याची योजना आहे. ब्रम्हपुत्रा नदी तिबेट म्हणजे जगाच्या सर्वात उंच पठारावर उगम पावते. ब्रम्हपुत्रा नदीला चीनमध्ये यार्लुंग त्सॅंगपो या नावाने ओळखतात. चीन ब्रम्हपुत्रेवर अनेक धरणं बांधत असून भारताने याआधीच त्यावर आक्षेप घेतला आहे. चीनने मात्र ही धरणं पाणी अडवण्यासाठी नसून फक्त नदी प्रकल्पांचा भाग असल्याचं म्हटलंय.