मनीला : १५व्या आसियान समीट आणि १२व्या ईस्ट एशिया समिटमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्सची राजधानी असलेल्या मनीलामध्ये पोहोचले. हे समिट सुरु व्हायच्याआधी मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. मागच्या चार महिन्यांमध्ये या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट आहे. याआधी जुलै महिन्यात जर्मनीतल्या जी20 समिटमध्ये मोदी-ट्रम्प भेट झाली होती.
ट्रम्पना भेटण्याआधी मोदींनी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो ड्यूट्रेटे, चीनचे प्रिमियर ली केकीआंग आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांचीही भेट घेतली.
मागच्या महिन्यात युएस-कॅनडाच्या नागरिकांना हक्कानी नेटवर्कच्या गोंधळातून सुरक्षित वाचवल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून पाकिस्तानची तारीफ केली होती. तसंच ११ नोव्हेंबरला अमेरिकेनं पाकिस्तानला ७० कोटी अमेरिकी डॉलर मदत म्हणून देण्याची घोषणा केली होती.
ट्रम्प सरकारनं पाकिस्तानसाठी वापरलेल्या या धोरणांमुळे भारताच्या चिंता वाढल्याचं बोललं जात होतं. मागच्या काही दिवसांमधल्या अमेरिका आणि पाकिस्तानमधल्या संबंधांमुळे मोदी-ट्रम्प भेट महत्त्वाची मानली जात आहे.