Bangladesh Violence: शेख हसीना देश सोडून पळून जाताच लष्कराने हाती घेतली सत्ता; लष्कर प्रमुख म्हणाले 'आता आम्ही..'

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला असून, पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या आहेत. यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली असून, देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 5, 2024, 04:05 PM IST
Bangladesh Violence: शेख हसीना देश सोडून पळून जाताच लष्कराने हाती घेतली सत्ता; लष्कर प्रमुख म्हणाले 'आता आम्ही..' title=

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला असून, पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या आहेत. बांगलादेशमधील पंतप्रधानाच्या निवासस्थानावर हजारोंच्या संख्येने जमावाने हल्ला केल्यानंतर लष्करी हेलिकॉप्टरने हसीना यांनी पळ काढला. यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली असून, देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हायअलर्ट जारी केला आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून, देश चालवण्यासाठी आम्ही अंतरिम सरकार स्थापन करु असं लष्करप्रमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. वाकेर-उझ-जमान यांनी सांगितलं की, "पंतप्रधान हसिना यांनी राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार देश चालवेल. आम्ही देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करु. नागरिकांनी हिंसाचार थांबवावा असं आमचं आवाहन आहे". आम्ही गेल्या काही आठवड्यांत झालेल्या सर्व हत्यांची चौकशी करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

तसंच देशातील हिंसाचार थांबवण्यासाठी लष्करावर विश्वास ठेवा असं आवाहन लष्कर प्रमुखांनी केलं आहे. "देशात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखा. आमच्यावर विश्वास ठेवा. आपण एकत्र काम करुयात. आम्हाला मदत करा, भांडून काहीही साध्य होणार नाही. वाद टाळा. आपण एकत्रित सुंदर देश उभारला आहे," असं त्यांनी सांगितलं. 

पुढे त्यांनी सांगितलं की, "मुख्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी लष्करासह झालेल्या चर्चेत सहभागी होते. आम्ही विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं तसंच घरी परतण्याचं आवाहन करत आहोत". दरम्यान यावेळी त्यांनी देशात कर्फ्यू लावणार नसल्याचं किंवा आणीबाणी जाहीर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "देशात कर्फ्यू किंवा आणीबाणी लावण्याची गरज नाही. आम्ही आज रात्रीपर्यंत यावर तोडगा काढू," असं आश्वासन त्यांनी दिलं.