What Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशमधील सत्ता लष्कार हाती घेणार आहे. चौथ्यांदा पंतप्रधान झालेल्या शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देऊन भारताच्या आश्रयाला आल्याचं वृत्त आहे. बांगलादेशमधील पंतप्रधानाच्या निवासस्थानावर हजारोंच्या संख्येनं जमावाने हल्ला केल्यानंतर लष्करी हेलिकॉप्टरने हसिना भारतात दाखल झाल्या आहेत. मात्र बांगलादेशमध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असेलला हा हिंसाचार नेमका का सुरु झाला आहे? यामागील कारणं काय आहेत? भारताचा याच्याशी काही संबंध आहे का? जाणून घेऊयात...
मागील महिन्यामध्ये बांगलादेशात हिंसाचाराला सुरुवात झाली. यामागील मुख्य कारण ठरलं देशातील सर्वात मोठं विद्यापीठ असलेल्या ढाका विद्यापीठामध्ये घडलेला हिंसाचार. येथील विद्यार्थ्यांचा पोलीस आणि सरकार समर्थकांबरोबर रक्तरंजित संघर्ष झाला. सरकारने जारी केलेल्या कोटा सिस्टीम आरक्षण या संघर्षाचं मूळ ठरलं. 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी या नव्या नियमानुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण दिलं जाईल असं जाहीर करण्यात आलं. पाकिस्तानीविरुद्ध झालेल्या या युद्धामध्ये बांगलादेशला भारताने मदत केली होती.
सरकारी नोकरीमधील या 30 टक्के आरक्षणाला आंदोलकांनी विरोध केला होता. हे आरक्षण सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीग पार्टीच्या समर्थकांसाठी फायद्याचं ठरणार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. या अशा आरक्षणाऐवजी गुणवत्तेवर आधारीत आरक्षण दिलं जावं असं आंदोलकांचं म्हणणं होतं. हे कोटा सिस्टीमचे आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आंदोलकांची मागणी होती.
बांगलादेशमध्ये कोटा पद्धतीचं आरक्षण, 1972 पासून सुरु करण्यात आलं होतं. मात्र 2018 मध्ये हे आरक्षण रद्द करुन पुन्हा काही काळाने लागू करण्यात आला होतं. इथूनच या कोटा पद्धतीला विरोध सुरु झाला. समीक्षकांनी केलेल्या दाव्यानुसार कोटा पद्धतीमुळे अवामी लीग समर्थकांना अयोग्यरित्या फायदा होतो. या आरक्षणामुळे कामगिरीच्या आधारावर पात्र उमेदवारांच्या संधी कमी होतात असा या आरक्षणाल विरोधक करणाऱ्यांचा दावा आहे. पंतप्रधान हसीना यांनी हिंसाचार वाढलेला असताना तो शांत करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यामध्ये आपल्या वादग्रस्त विधानांनी तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटलं. या आंदोलनामध्ये 100 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
यानंतर आरक्षणाविरोधात सुरु झालेलं हे आंदोलन या विषयाची मर्यादा ओलांडून राष्ट्रव्यापी सरकारविरोधी आंदोलन झालं. समाजामधील वेगवेगळ्या घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने शेख हसिना यांचं सरकार कोंडीत सापडलं. यामध्ये क्रिकेटपटू, सेलिब्रिटी, संगितकार आणि कंपन्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. कापड निर्मिती कंपन्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सरकारच्या अस्तित्व धोक्यात येणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर अनेक रॅप साँग आणि कॅम्पेन चालवून शेख हसिना यांचा राजीनामा मागितला जात होता.
2009 पासून बांगलादेशमध्ये शेख हसिना यांची सत्ता आहे. हसिना यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणूक जिंकून सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र या निवडणुकीवर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहिष्कार टाकल्याने हसिना यांना ही निवडणूक सोपी गेली. मात्र सध्याच्या हिंसाचारामुळे हसिना यांच्याविरोधातील रोष उघडपणे समोर आला आणि त्यामधूनच आता हसिना यांना देश सोडावा लागला असून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.