Image Of Hindu Goddess On Beer Bottle: ब्रिटनमध्ये मद्यविक्री करणाऱ्या एका कंपनीने बीयरच्या बाटल्यांवर छापलेल्या चित्रावरुन वाद निर्माण झाला आहे. 'बिएन मंगर' (Bien Manger) नावाच्या कंपनीने आपल्या कंपनीच्या बीयरच्या बाटल्यांवर हिंदू देवीचा फोटो छापला आहे. आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीविरोधात टीकेची झोड उठली आहे. मोठ्याप्रमाणात लोक या कंपनीच्या फोटो सिलेक्शनवरुन टीका करत आहेत. हिंदू समाजातील लोकांनी या कंपनीने आपलं हे प्रोडक्ट बाजारातून मागे घ्यावं अशी मागणी केली आहे. ब्रिटनमध्ये हिंदू आणि भारतीयांसंदर्भातील बातम्या देणाऱ्या सोशल मीडियावरील 'इनसाइड यूके' (INSIGHT UK) नावाच्या पेजवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
'इनसाइड यूके'ने मद्यनिर्मिती करणाऱ्या बिएन मंगर नावाच्या कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे. या कंपनीने बीयरच्या बाटल्यांवर लक्ष्मी देवीचा फोटो छापून हिंदूंच्या भावाना दुखावल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. हिंदूंच्या भावाना दुखावून हे प्रोडक्ट बाजारात विकलं जात असून त्याला आमचा विरोध असल्याचं हिंदूंचं म्हणणं आहे. 'इनसाइड यूके'ने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन या बीयर बॉटलचा फोटो शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बीयरच्या बाटलीवर हिंदू देवीचा फोटो लावल्याने ब्रिटनमधील हिंदू समुदायानेही कंपनीचा विरोध केला आहे. वेळीच या बीयरच्या बाटलीवरील हिंदू देवतांचा फोटो हटवण्यात आला नाही तर विरोध अधिक तीव्र होईल असा इशारा हिंदू सामाजातील व्यक्तींनी दिला आहे. अशाप्रकारे बीयर किंवा मद्याच्या माध्यमातून ब्रिटनमध्ये हिंदू देवी-देवतांचा अवमान झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारेच वाद निर्माण झाले आहेत.
Bien Manger uses sacred image of Hindu Goddess on their beer bottle.@BienManger it's highly insensitive, disrespectful & hurtful to #Hindus. The Goddess Hindus worship is being used on your beer bottles. We demand you recall all such products & stop further manufacturing of it. pic.twitter.com/NiSvQ47Hh1
— INSIGHT UK (@INSIGHTUK2) January 10, 2023
यापूर्वी 2021 मध्ये फ्रान्समधील मद्यविक्री क्षेत्रातील 'ग्रेनेड-सूर-गोरोन' नावाच्या कंपनीने 'शिवा बीयर' नावाने मद्य बाजारात आणलं होतं. यावेळीही हिंदू समाजाने या गोष्टीचा विरोध केला होता. 2018 साली 'डर्बीशायर' नावाच्या कंपनीने आपल्या बीयरच्या बाटलीवर काली मातेचा फोटो छापला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी या कंपनीचा विरोध केला होता.