इस्लामाबाद : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील मदरशात हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. तर ७० जण जखमी झाले असून यात मुलांचा जास्त समावेश आहे.
'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. जखमींना लेडी रिडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने बॅग घेऊन मदरशामध्ये प्रवेश केला. नंतर बॅगेत ठेवलेला बॉम्ब फुटला. दरम्यान, मदत आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचले आहे.
रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले की, आतापर्यंत सात मृतदेह रुग्णालयात आणले गेले आहेत. ७० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.