China Sperm Donation: चीनमधील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (university students) स्पर्म डोनेट (Sperm Donation) करणं हा पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग ठरण्याची शक्यता आहे. चीनची लोकसंख्या कमी होत असल्याने या आव्हानाला तोंड देण्यासाठी हे विद्यार्थ्यांची मदत होऊ शकते. बीजिंग आणि शंघायसहीत संपूर्ण चीनमध्ये अनेक स्पर्म डोनेश क्लीनिक्सने नुकतीच विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे.
सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचं आवाहन देशातील ट्विटरसदृष्य वीबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन करण्यात आलं आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर स्पर्म डोनेशन ट्रेडिंग विषय ठरत आहे. या प्लॅटफॉर्मवर युझर्स स्पर्म डोनेशनसंदर्भात चर्चा करताना दिसत आहे. यंदाच्या आठवड्यामध्ये या माध्यमावरील या विषयासंदर्भातील थ्रेड्स हे 240 मिलियन्सहून अधिक इंटरॅक्शन असणारे होते.
स्पर्म डोनेट करण्यासाठी विद्यापीठांमध्ये सर्वात आधी आवाहन करणारी स्पर्म बँक ही नैऋत्य चीनमधील युन्नान प्रांतामधील ह्यूमन स्पर्म बँक होती. या बँकेने 2 फेब्रुवारी विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेशनसंदर्भातील आव्हान केलं होतं. यामध्ये स्पर्म डोनेशनचे फायदे, नोंदणीसाठीच्या अटी, सबसिडी आणि स्पर्म डोनर होण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर चीनमधील अन्य प्रांतांमधील आणि शहरांमधील स्पर्म डोनेशन बँकांनी अशाच पद्धतीच्या जाहिराती करण्यास सुरुवात केली.
सरकारी वृत्तपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'ने शुक्रवारी दिलेल्या एका बातमीमध्ये, "वायव्य चीनमधील शानक्सी प्रांतासहीत अन्य ठिकाणी स्पर्म बँकांनी अशाप्रकारची आवाहनं केली आहेत. त्यानंतर जनतेमध्ये यासंदर्भातील उत्सुकता निर्माण झाली आहे. या विषयावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 6 दशकांमध्ये पहिल्यांदाच 2022 मध्ये चीनची लोकसंख्या कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे," असं म्हटलं आहे.
वेगवगळ्या स्पर्म बँकांनी स्पर्म डोनेट करणाऱ्या लोकांना यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची माहिती दिली आहे. युन्नान स्पर्म बँकेने दिलेल्या माहितीनुसार स्पर्म डोनेट करणाऱ्यांचं वय 20 ते 40 वर्षांदरम्यान असलं पाहिजे. तसेच स्पर्म डोनेट करणाऱ्यांची उंची 165 सेंटीमीटरपेक्षा अधिक हवी. त्यांना कोणत्याही पद्धतीचा संसर्ग किंवा अनुवंशिक रोग नसावा. तसेच स्पर्म डोनेट करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे एखादी शैक्षणिक पदवी असावी किंवा ते पदवीचा अभ्यास करणारे असावेत.
'ग्लोबल टाइम्स'च्या वृत्तानुसार, "डोनरची वैद्यकीय चाचणी घेथली जाईल. जे पात्र ठरतील त्यांना 8 ते 12 वेळा स्पर्म डोनेशन केल्यानंतर 4500 युआन (भारतीय रुपयांमध्ये 54 हजार 500 रुपये) सबसिडी म्हणून दिली जाईल." तर शानस्की स्पर्म बँकेने दिलेल्या माहितीनुसार डोनरची उंची किमान 168 सेंटीमीटर असावी. तसेच या बँकेकडून प्रत्येक डोनरला 5000 युआन (60 हजार 600 रुपये) दिले जातील. शंघायमधील एका स्पर्म बँकेने 7000 युआनची (84 हजार 800 रुपये) सर्वाधिक सबसिडी देण्याची ऑफर दिली आहे. मात्र या बँकेच्या अटी अधिक कठोर आहेत. यामध्ये केस गळण्याची समस्या नसणारा, धुम्रपान, मद्यपान न करणारा डोनर असावा असं म्हटलं आहे.
मागील 61 वर्षांमध्ये पहिल्यांदाच चीनची लोकसंख्या कमी झाली आहे. चीनमधील राष्ट्रीय सांख्यिक ब्यूरोने जारी केलेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये चीनची लोकसंख्या 8,50,000 इतक्या संख्येनं कमी झाली.