बीजींग : दलाई लामा यांना भेटणे किंवा बोलणे हा एक 'गंभीर अपराध' समजला जाईल, असा अप्रत्यक्ष फतवाच चीनने काढला आहे. दलाई लामा हे गेली अनेक तिबेटला चीनपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यासाठी तेथील जनतेला ते नेहमी भडकवत असल्याचा आरोप चीन सातत्याने करत आला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी दलाई लामांना भेटू नये, असे चीनने म्हटले आहे.
तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कुटनीतीसाठी जगभरातील नेत्यांनी बीजींगशी संपर्क साधावा असे अवाहनही चीनने जगभरातील राष्ट्रांना केले आहे. काही महिन्यांपूर्वीच दलाई लामा यांनी भारतातील राज्य अरूणाचल प्रदेशसह उत्तर-पूर्व भागाचा दौरा केला होता. तसेच, तेथील मंदिरांनाही भेटी दिल्या होत्या. या भेटीलाही चीनने विरोध केला आहे. चीन सरकारविरोधातील बंड फसल्यावर तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी १९५९मध्ये स्थलांतर केले होते. तेव्हापासून ते भारतात निर्वासीत म्हणून राहात आहेत.
चीनमदील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे (सीपीपी) युनाईटेड फ्रंड वर्क डिपार्टमेंटचे कार्यकारी उपाध्यक्ष झांग यीजियोंग यांनी म्हटले आहे की, दलाई लामांना भेट देणे किंवा त्यांच्या निमंत्रण देणे किंवा त्याचा स्विकार करणे हे चीनी नागरिकांच्या भावनांना धक्का पोहोचवणे आहे, असे समजले जाईल. ८२ वर्षीय दलाई लामांना धार्मिक नेता म्हणून भेटने हेसुद्धा अपराध म्हणूनच पाहिले जाईल असेही झांग यांनी म्हटले आहे.
झांग यांनी भारताच्या नावाच उच्चार न करता म्हटले आहे की, दलाई लामा १९५९ पासून आपल्या मातृभूमीला धोका देत पळाले आहेत. तसेच, त्यांनी निर्वासीत म्हणून दुसऱ्या देशात जाऊन पर्यायी सरकार स्थापन केले आहे. १४वे दलाई लामा हे अध्यात्मिक धर्मगुरू नसून ते एक राजकीय नेते आहेत, असेही झांग यांनी म्हटले आहे.