कूपन 230 रुपयांचं अन् बिल आलं लाखोंचं... कर्ज काढून केलं पेमेंट; घटनेची जगभरात चर्चा

Haircut Worth Rs Lacks: त्याला त्याच्या मित्राने एक कूपन दिलं होतं. त्या मित्रानेच हे कूपन वापरुन हेअरकट करुन घेण्याचा सल्ला या मुलाला दिलेला. एका रेस्तराँमध्ये वेटर म्हणून काम करणारा हा मुलगा कूपन वापरण्यासाठी या सलूनमध्ये गेला अन् संकटात अडकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2023, 03:45 PM IST
कूपन 230 रुपयांचं अन् बिल आलं लाखोंचं... कर्ज काढून केलं पेमेंट; घटनेची जगभरात चर्चा title=
मित्राने या तरुणाला दिलेलं कूपन (प्रातिनिधिक फोटो)

Haircut Worth Rs Lacks: सलूनमध्ये पुरुषांचे केस कापण्यासाठी सामान्यपणे किती पैसे लागतात? सामान्यपणे अगदी 50 रुपयांपासून ते 1000 रुपयांच्या रेंजमध्ये या प्रश्नाचं उत्तर देता येईल. मात्र एका तरुणाला हेअरकटनंतर तब्बल 1 लाख 15 हजारांचं बिल हाती टेवण्यात आलं आणि त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. मुळात हा मुलगा केवळ 230 रुपयांची  हेअरकट करण्यासाठी गेला होता. बिलाची रक्कम पाहून या मुलाला मोठा धक्का बसला. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्याने कर्ज घेऊन बिल भरावं असा आग्रह सलूनवाल्याने केला. सध्या जगभरामध्ये चर्चेत असलेल्या या प्रकरणाचं वृत्तांकन साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने केलं आहे. नेमकं घडलं काय आणि या मुलाचं काय झालं जाणून घेऊयात...

नेमकं घडलं काय?

चीनमधील जेंगजियांग प्रांतामधील हांग्जो शहरात हा प्रकार घडला. ली अडनावाच्या मुलाबरोबर हा प्रकार घडला. ली एका रेस्तराँमध्ये हा मुलगा वेटरचं काम करत होता. एका मित्राने या मुलाला हेअरकटसाठी 20 युआन म्हणजेच 230 रुपयांचं गिफ्ट कूपन दिलं. या कूपनचा वापर करुन बीजिक्सिंग नावाच्या सलूनमध्ये हेअरकट करता येईल असं या मुलाला सांगण्यात आलं. मात्र हेअरकट करण्यासाठी तो सलूनमध्ये गेला तेव्हा हेअरकट आधी त्याला हेअर मसाज आणि इतर सेवा घ्याव्या लागतील, असं सांगण्यात आलं. या मुलाला हेअर मसाज दिल्यानंतर त्याला फेसपॅकही लावण्यात आलं. यानंतर या मुलाला सलूनमधून 5 हजार युआन (58 हजार रुपयांचं) गिफ्ट कुपन घेण्यास सांगण्यात आलं. हे गिफ्ट कुपन घेतलं तर अधिक सूट मिळेल असं आमिष या तरुणाल दाखवण्यात आलं. केस कापण्यासाठी चष्मा लावला नसल्याने या तरुणाला रेट कार्ड दिसत नव्हतं. त्याने केवळ ऐकलेल्या गोष्टींना होकार दिला. 

...म्हणून मी काही करु शकलो नाही

ली ने होकार दिल्यानंतर केस कापणाऱ्याने त्याच्या केसांना वेगवेगळ्या क्रीम आणि तेल लावलं. त्यानंतर केस कापून झाल्यावर या तरुणाच्या हातात देण्यात आलेलं बिल पाहिल्यानंतर या तरुणाला धक्का बसला. या बिलाच्या आकड्याने लाखो रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या मुलाने आपल्याकडे केवळ 20 युआनचं कुपन असल्याचं सांगितल्यानंतर सलूनवाल्याचा आणि त्याचा वाद झाला. अखेर या मुलाला दमदाटी करुन त्याच्या मोबाईलवरुन सलूनमधील कर्मचाऱ्यांनी क्रेडिट अॅप डाऊनलोड केलं आणि 57 हजार रुपयांचं बिल वसूल केलं. आता हे 57 हजारांचं कर्ज या मुलाला फेडावं लागणार आहे. आपल्यावर सलूनमधील कर्मचाऱ्यांनी दबाव आणला. त्यामुळे आपण अनेक गोष्टींना इच्छा असूनही नकार दिला नाही. आता हा तरुण आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपली व्यथा मांडताना दिसत आहे. 

सलून सध्या बंद करण्यात आलं

आपण अनेकदा रेटकार्ड संदर्भात विचारणा करुनही मला ते दाखवण्यात आलं नाही असा ली चा आरोप आहे. आपल्याकडे पैसे नसल्याचं मी बिल पाहून सांगितल्यानंतर मला सलूनच्या कर्मचाऱ्यांनी चहूबाजून वेढा दिला आणि माझ्यावर ओरडू लागले. माझा मोबाईल खेचून घेत त्यावर कर्ज काढून त्यांनी बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा केली. या प्रकरणानंतर हे सलून स्थानिक प्रशासनाने बंद केलं असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.