इस्लामाबाद : भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने आजवर दहशतवादाची आणि कांगावेखोरीची मदत घेतली आहे. मात्र, पाकिस्तानने आता खेळलेल्या नव्या चालीमुळे पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या वेळी पाकिस्तानने चक्क एका चीनी कंपनीला कच्छ रणमधली तब्बल 65 एकर जमीन भाडेतत्त्वावर दिली आहे. पाकच्या या खेळीमुळे भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच, या परिसरात कोळशाच्या खाणीही आहेत. त्यामुळे भारतीय परिसरात पर्यावरण प्रदुषणाचाही मुद्दा ऐरणीवर येणार आहे.
चीनने यापूर्वीच सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात कोळशाच्या खाण आणि पॉवर प्रोजेक्ट लागू केला आहे. हा परिसर भारतीय सीमेपासून केवळ 40 किलोमिटरच्या अंतरावर आहे. तर, कच्छच्या रणापासून दूसऱ्या टप्प्यातील प्रोजेक्ट भारतीय सीमेपासून केवळ 10 किलोमिटर अंतरावर आहे. त्यामुळे कोणत्याही अनूचीत प्रसंगी चीन आणि पाकिस्तानकडून या प्रोजेक्टच्या आडून मिलिट्री बेस बनविण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शत्रूने भारताच्या सीमेपार सुमारे 125 मीटर लांब अंतरापर्यंत खोलवर पेरलेल्या भूसुरूंगांची संख्या आणि स्थान शोधायलाही मोठा अडथळा येऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, शेजारी देश सीमापार सुरूंग पेरत आहे. द प्रिंट ने दिलेल्या वृत्तानुसार उपग्राहाकडून समोर आलेल्या छायाचित्रात मोठी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही छायाचित्रे 28 ऑक्टोबर 2017ला घेण्यात आली आहेत. थारपारकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रोजेक्टचे 70 टक्के काम पूर्ण होणार आहे.