नवी दिल्ली : जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आतापर्यंत जगात कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या वाढून 26,37,681 झाली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1,84,220 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 7,17,759 लोकं रूग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत.
अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहेत. अमेरिका कोरोनामुळे संक्रमित आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत रोज नवीन संकटात सापडत आहे.
कोरोनाचा जन्म चीनच्या वुहानमध्ये झाला होता, परंतु आतापर्यंत त्याने चीनपासून 11 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेत जगातील सर्वाधिक 8,48,994 लोकांना याची लागण झाली असून 47676 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 1,738 लोकांचा मृत्यू झाला आहे. केवळ अमेरिकेत आतापर्यंत सुमारे 42 लाख चाचण्या झाल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, अमेरिका मोठ्या प्रमाणात चाचणी सुविधा विकसित करण्यात आघाडीवर आहे.