नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या तडाख्यात सापडलेल्या स्पेनमधील परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. कारण, स्पेनमध्ये एका दिवसात तब्बल ८५०० जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे. बुधवारपर्यंत स्पेनमध्ये ४७,६१० जणांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी दुपारपर्यंत हा आकडा थेट ५६,१८८ वर जाऊन पोहोचला होता.
आज दिवसभरात स्पेनमध्ये कोरोनाने ६५५ जणांचा बळी घेतला. बुधवारीही अवघ्या २४ तासांत याठिकाणी कोरोनामुळे ७०० लोकांनी प्राण सोडला होता. त्यामुळे आता स्पेनमधील मृतांचा आकडा ४०८९ इतका झाला आहे.
कोरोनाच्या उत्पत्तीचे मुख्य केंद्र असलेला चीन आता सावरत आहे. मात्र, इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाने अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. सध्याच्या घडीला जगातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा २१ हजारावर जाऊन पोहोचला आहे.
इटली आणि स्पेनच्या तुलनेत भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे भारतात कोरोनाचा साथीच्या आजाराप्रमाणे फैलाव सुरु झाल्यास अरिष्ट ओढावेल. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ६४९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी प्रसाराचा वेग हा स्थिर आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास भारतावर कोरोनाचा तितकासा विपरीत परिणाम होणार नाही, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.