कोरोनाच्या भीतीमध्ये चीनचा जगाच्या व्यापारावर कब्जा

कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडलं आहे.

Updated: Mar 26, 2020, 05:07 PM IST
कोरोनाच्या भीतीमध्ये चीनचा जगाच्या व्यापारावर कब्जा title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडलं आहे. पण हा व्हायरस जिकडून आला ते चीन मात्र आता निश्चिंत दिसत आहे. एवढच नाही तर चीनचे व्यापारी संपूर्ण जगातल्या कंपन्यांचे शेयर विकत घेत आहे. जागतिक बाजारपेठेत चीन लपून छपून हे शेयर विकत घेत आहे. चीनची सगळ्यात मोठी कंपनी अलीबाबाची हाँगकाँग लिस्टिंगने १.५४ टक्के आणि टेनसेंटने ०.३९ टक्के नफा एका आठवड्यात कमावला आहे, असं फोर्ब्समधले शेयर मार्केट तज्ज्ञ ब्रॅन्डन हर्न यांनी सांगितलं आहे.

चीनच्या कंपन्या हाँगकाँगचा शेयर बाजार हेंग-सेंगच्या माध्यमातून बाजारात शेयर खरेदी करत आहे. या कारणामुळे हेंग-सेंगमध्ये ३२ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. ही वाढ मागच्या १ वर्षातल्या वाढीच्या दुपट्ट आहे.

मागच्या आठवड्यात चीनचं स्टॉक एक्सचेंज शांघाई आणि शेनजेनने मागच्या २ वर्षातली सर्वोत्तम कामगिरी केली. या शेयर मार्केटमध्ये ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली, असं प्रतिष्ठित बिझनेस न्यूजपेपर ब्लूमबर्गच्या स्तंभलेखक माक्सि यिंग यांनी लिहिलं आहे.

जागतिक शेयर बाजारात घसरण

एकीकडे चीनमधल्या शेयर मार्केटची आगेकूच सुरू असताना जगातला व्यापार मात्र ठप्प झाला आहे. याचा परिणाम तिथल्या शेयर मार्केटवर होत आहे. चीन वगळता संपूर्ण आशिया खंडातल्या शेयर बाजारात १० टक्क्यांची सरासरी घसरण झाली आहे, त्यामुळे जपान, कोरिया, मलेशिया आणि भारतात गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.

जगाची ही परिस्थिती असताना चीन मात्र शेयर बाजारात प्रगती करत आहे. तेही अशावेळी जेव्हा चीनचं व्यापारी शहर असलेल्या वुहानचा कोरोनामुळे विध्वंस झाला आहे.

कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाल्यावर हा व्हायरस जगाच्या १९६ देशांमध्ये पोहोचला. कोरोना व्हायरसमुळे भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर इटलीमध्ये मृतदेह उचलण्यासाठी लष्कराला बोलवावं लागलं आहे. WHO ने न्यूयॉर्क हे कोरोना व्हायरसचं नवीन केंद्र असल्याचं सांगितलं आहे. स्पेनमधली स्थितीही अत्यंत भीषण आहे. तर जर्मनी, फ्रान्स यांच्यासारखे विकसित देशही कोरोनाचा सामना करताना उद्धवस्त झाले आहेत.

कोरोना व्हायरसचा मोठा धक्का लागल्यानंतरही चीनने त्यांच्याकडची परिस्थिती सामान्य असल्याचं सांगितलं आहे. चीनमधले उद्योग, बाजार, व्यवहार आणि शेयर मार्केट पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीमध्ये आलं आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे संपूर्ण जगातल्या स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा चीनने घेतला. चीनने कंपन्यांचे शेयर कमी किंमतीमध्ये विकत घेतले. जगातल्या अनेक कंपन्यांचे मालकी हक्क चीनच्या हातात जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चीनने जगाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा मिळवण्यासाठी कोरोना व्हायरसचा हत्यार म्हणून वापर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चीनने कोरोनाग्रस्त असलेल्या आपल्या भागामध्ये WHO तसंच इतर संस्थांना शिरकावही करु दिला नाही. सत्य जगापासून लपवण्यासाठी चीनने हे पाऊल उचललं का? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

चीन आणि कम्युनिस्ट इतिहास

चीनसारख्या कम्युनिस्ट देशात मानवाधिकारांसारख्या गोष्टींना महत्त्व दिलं जात नाही, त्यामुळे चीनने आपल्या फायद्यासाठी कोरोना व्हायरसचा वापर केला का? असा सवाल आहे. कोरोना व्हायरसचे बहुतेक बळी हे आजारी आणि वृद्ध आहेत. अशा लोकांच्या जगण्याचा चीनच्या कम्युनिस्ट शासनाला अजिबात फायदा नसल्याचा आरोपही होत आहे. चीनला कम्युनिजमकडे ढकलणाऱ्या माओ त्से तुंगच्या तथाकथित क्रांतीमुळे १९४८ साली ७ कोटी ७० लाख जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते.

माओनंतर सगळ्यात शक्तीशाली राष्ट्रपती म्हणून शी जिनपिंग समोर आले आहेत. जिनपिंग यांना अनंत कालावधीसाठी पदावर राहण्याची सूट मिळाली आहे. शी जिनपिंग यांची सत्ता पूर्णपणे निरंकुश आहे, त्यामुळे संशयाची सुई तिथपर्यंत जाऊन पोहोचत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोरोना व्हायरसचा उल्लेख चीनी व्हायरस असाच केला आहे. चीनने मात्र याला आक्षेप घेतला आहे. अमेरिकेचे वकील लॅरी केलमेन यांनी चीनविरुद्ध २०० खरब डॉलरचा खटला दाखल केला आहे. चीनने कोरोना व्हायरस युद्धासाठीचं जैविक हत्यार म्हणून बनवल्याचा आरोप लॅरी केलमेन यांनी केला आहे. चीनने अमेरिकन कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे, करार आणि मापदंडाचं उल्लंघन केलं आहे. कोरोना व्हायरसला प्रभावी आणि विनाशकारी जैविक युद्धासाठीचं हत्यार म्हणून लोकांना मारण्यासाठी वापरण्यात आलं आहे, असा दावा लॅरी केलमेन यांनी केला आहे.