कोरोनाची पकड मजबूत होत असतानाच आली 'ही' दिलासादायक बातमी

अनेकांनी या व्हायरसच्या साथीमध्ये आपले प्राण गमावले असताना....   

Updated: Mar 16, 2020, 03:06 PM IST
कोरोनाची पकड मजबूत होत असतानाच आली 'ही' दिलासादायक बातमी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : संपूर्ण जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना या विषाणूचा संसर्ग पाहता पाहता झपाट्याने वाढू लागला आहे. चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरलेल्या या कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढत आहे. WHOच्या अधिकृत संकेतस्थळावर या विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडाही देण्यात आला आहे, जो पाहता परिस्थितीचं गांभीर्य  विचार करायला भाग पाडलं आहे.

WHOनुसार, आतापर्यंत जगभरात 1,64,837हूनही अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये मृतांचा आकडा 6,470च्याही पलीकडे पोहोचला आहे (हा आकडा सातत्याने बदलत आहे). जवळपास १४६ देश कोरोनामुळे प्रभावित झाले आहे. चीनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर त्यामागोमाग इराण, इटली आणि स्पेन या राष्ट्रांमध्ये कोरोनाचं थैमान पाहायला मिळत आहे. 

भारतापर्यंतही कोरोना पोहोचला असून, देशातील रुग्णांची संख्या आता ११४वर पोहोचल्याचं लक्षात येत आहे. भारतात महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या आढळली आहे. परिणामी प्रशासनाकडून सावधगिरीची सर्व पावलं उचलण्यात येत आहे. युद्धपातळीवर कोरोनाशी लढण्यास प्रत्येकाचाच प्रयत्न सुरु आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी वाढतच असताना सर्वसामान्यांमध्ये याविषयी चिंतेचं वातावरण आहे. असं असलं तरीही या व्हायरसची लागण झाल्याचं निदर्शनास येताच सुयोग्य पद्धतीने उपचार घेतले असता रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची उदाहरणंही पाहायला मिळत आहेत. कोरोनाची भीती असतानाच याच्या विळख्यातून सुखरुप बचावलेली उदाहरणं पाहिली असता मानव जातीपुढे उभ्या राहिलेल्या या प्रश्नावर किमान समाधानही असल्याची सकारात्मक बाजू पाहायला मिळत आहे. 
भारतातही कोरोनाचे जवळपास दहा रुग्ण सावरले असून त्यांना रुग्णालयातून गरी पाठवण्यात आलं आहे. म्हणजेच हा आकडा काहीसा कमी झालेला स्पष्ट होत आहे. एकट्या चीनमध्येही कोरोनातून बचावलेल्यांचा आकडा समाधानकारक आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास ७० हजारहून अधिक रुग्ण बरे झाल्याचं वृत्तही काहींनी प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान कोरोनातून सावरलेले रुग्ण अद्यापही कमालीची काळजी घेत असून, इतरांशी संपर्क टाळत आहेत. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

चीनच्या वुहानमध्येच कोरोनाशी १०३ वर्षांच्या आजीबाईंची यशस्वी झुंज 

वृद्ध आणि नवजात बालकांमध्ये लागण होण्याचा जास्त धोका असणाऱ्या कोरोना व्हायरसमधून चीनमध्ये अनेक वृद्ध सावरत आहेत. यामध्ये एका Zhang Guangfen नावाच्या एका आजीबाईंचाही समावेश आहे. ज्यांना १ मार्चला वुहानमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर योग्य उपचारांत्या बळावर सहा  ते सात दिवसांत त्यांना घरीही पाठवण्यात आलं होतं. मागील आठवड्यात १०० वर्षांच्या एका व्यक्तीवरही मिलिटरी डॉक्टरांनी उपचार केले, ज्यानंतर तो व्यक्तीही कोरोनातून बचावल्याचं वृत्त समोर आलं. 

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरीही त्याचून बचावलेल्यांचा आकडाही या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये दिलासा देणारा ठरत आहे. मुख्य म्हणजे सुयोग्य उपचार, योग्य काळजी आणि कमालीच्या सकारात्मकतेच्या बळावर कोरोनावर मात करता येऊ शकते असं, भारतातील एका कोरोनाग्रस्त रुग्णाने सर्वांनाच सांगितलं आहे. कोरोनावर मात केल्यानंतर स्वगृही परतलेल्या या रुग्णाने आता इतरांच्या मनात कोरोनाविषयी असणारी भीती दूर करत जनजागृती करण्याचा निर्धारही केला आहे.