5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम

Bangkok News: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 18, 2024, 04:34 PM IST
5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम title=
Cyanide found on teacups where six people died in luxury Thai hotel in Bangkok

Bangkok Hotel Death News: थायलंडची राजधानी बँकोकच्या लक्झरी हॉटेलमध्ये 6 परदेशी नागरिकांचा झालेला मृत्यू हा सध्या जगभरात चर्चेचा ठरलेला आहे. दोन अमेरिकी आणि चार व्हिएतनामच्या नागरिकांचा मृत्यू झाला असून यात तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आता या प्रकरणात सायनाइडमुळं त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

बँकोकचे फाइव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयात इरावनच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या लक्झरी सूटमध्ये सहा जण थांबले होते. मात्र, मंगळवारी दुपारी सर्वच्या सर्व त्यांच्या खोलीत मृतदेह आढळले. सुरुवातीला त्यांच्यासोबत आणखी एक सातवा व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात कोणी दुसरा व्यक्ती सामील नाहीये. ऑटोपसी रिपोर्टमध्ये या सहाही जणांच्या शरीरात सायनाइड विषाचे अंश सापडले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व सहाही जण वेगवेगळ्या तारखेला हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, 15 जुलै रोजी सर्वांना एका लग्झरी सूटमध्ये शिफ्ट झाले होते. 15 जुलै रोजी दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खोलीत जेवण देण्यात आले. मात्र, त्यानंतर कोणीही त्यांच्या खोलीतून बाहेर आलं नाही. 

सहाही जण सोमवारी हॉटेलमधून चेक आऊट करणार होते. मात्र, वेळ होऊन गेल्यानंतरही त्यांनी चेकआऊट केलं नाही. म्हणून हॉटेलचे कर्मचारी त्यांच्या खोलीत पोहोचले. तिथे या सर्वांचे मृतदेह पडलेले होते. त्याचबरोबर टेबलवर त्यांना आदल्या दिवशी डिलिव्हर करण्यात आलेले जेवण होते. हे जेवण तसंच्या तसं होतं. तर, बाजूलाच चहा आणि कॉफीचे काही कप ठेवण्यात आले होते. मृत व्यक्तींची ओळख एनगुयेन फुआंग, होंग फाम थान्ह, थी एनगुयेन फुओंग लान, दिन्ह ट्रान फु आणि अमेरिकेतील शेरीन चोंग आणि डेंग हुंग वेन अशी पटली आहे. 

थायलँड पोलिसांच्या फॉरेंसिग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या खोलीत जे कप आणि चहाचे थर्मास सापडले आहेत त्यांच्यात सायनाइटचे काही अंश सापडले आहेत. मृतांच्या रक्तातदेखील केमेकिल आढळले आहेत. चहाच्या सर्व कपात आणि टीपॉटमध्ये सायनाइड सापडले आहेत. ऑटोपसी रिपोर्टमध्येही सर्वांच्या शरीरात सायनाइड सापडले आहे. शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नाहीये. 

बँकोकच्या पोलिस चीफ नोपसिन पुनसावत यांनी म्हटलं की, या सहा लोकांमध्ये एक लग्न झालेले जोडपं देखील होते. या दोघांनी अन्य लोकांसोबत मिळून जवळपास दोन लाख 78 हजार डॉलरची गुंतवणूक केली होती.  त्यांनी ही गुंतवणूक जपानमध्ये एक रुग्णालय खोलण्यासाठी केली होती. हे सर्व जण या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठीच एकत्र आले होते. त्यांच्यातीलच एकाने चहात विष टाकून सर्वांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांनी म्हटलं आहे की, चार मृतदेह लिव्हिंग एरियामध्ये तर दोन बेडरुममध्ये होते. एका सातव्या व्यक्तीनेदेखील हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. तो या सहा व्यक्तीपैंकी एकाचा भाऊ होता. पण तो 10 जुलै रोजीच थायलंडहून रवाना झाला होता. या हत्याकांडात त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीयेत.