इस्लामाबाद : इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आता कामाला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी डिझेलची किंमत १७ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री गुलाम सरवर यांनी याचे संकेत दिले आहेत. डिझेलचे भाव कमी केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात येतील, असा पाकिस्तान सरकारचा अंदाज आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांचं सरकार डिझेलची किंमत कमी करून पेट्रोलच्या किंमतीपर्यंत आणण्याची योजना आखत आहे, अशी माहिती पाकिस्तानमधल्या माध्यमांनी दिली आहे. संघारमध्ये कच्चं तेल आणि प्राकृतिक गॅसचं भंडार मिळालं आहे, असं सरवर म्हणाले. तसंच पाकिस्तानचं नवं नेतृत्व तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया (तापी) पाईपलाईनच्या कामामध्ये तेजी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमध्ये डिझेलचे भाव ११२.९४ रुपये प्रती लीटर होते. तर पेट्रोलचे भाव ९५.२४ रुपये प्रती लीटर होते.
याचबरोबर नव्या सरकारनं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर अधिकाऱ्यांच्या खर्चावर लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान , प्रधान न्यायाधीश, सिनेट चेअरमन, नॅशनल असेंबलीचे स्पिकर आणि मुख्यमंत्री क्लब/बिजनेस श्रेणीमधून विमान प्रवास करतील, असा निर्णय इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखालच्या बैठकीत घेण्यात आल्याचं पाकिस्तानचे माहिती आणि सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं.