'लग्न करायचंय पण अंतराळात अडकलोय, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव...'

ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, पृथ्वीवर परतण्यासाठी तिने त्याला लाखो रुपये दिले, पण... 

Updated: Oct 18, 2022, 05:38 PM IST
'लग्न करायचंय पण अंतराळात अडकलोय, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव...'   title=

Trending News : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असते. मग तीने किंवा त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी वाटते.  पण अनेकवेळा याचा गैरफायदा घेतला जातो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमात पडलेल्या महिलेला एका ठगाने पैसे उकळण्यासाठी सांगितलेलं कारण ऐकून तुम्ही थक्कच व्हाल.

सोशल मीडियावर त्या दोघांची ओळख झाली, त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्याकडून लाखो रुपये उकळले. पण आपण फसवलो गेलो आहे हे कळल्यानंतर त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण जपानमधलं आहे. त्या व्यक्तीने आपण अंतराळवीर असल्याचं सांगत पृथ्वीवर परत येण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असल्याचं महिलेला सांगितलं. पृथ्वीवर परत आल्यावर आपण लग्न करु असं आश्वासनही त्याने दिलं. आपण आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात (International Space Station, ISS) काम करत असल्याचं त्याने तिला सांगितलं. एका संशोधनासाठी आपण अंतराळात गेलो पण आता पृथ्वीवर परतण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं कारण त्याने दिलं.

इन्स्टाग्रामवर झाली ओळख
जूनमध्ये जपानमध्ये रहाणाऱ्या या महिलेची इन्स्टाग्रामवर आरोपीशी ओळख झाली. आरोपीच्या प्रोफाईलमध्ये अंतराळवीराचे फोटो आळढून आले. त्यामुळे ती महिला त्याच्यावर भाळली. दोघांमध्ये चॅटिंग सुरु झालं. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. इतकंच नाही तर आरोपीने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. पृथ्वीवर परतल्यावर जपानमध्ये येऊन आपण लग्न करण्याचं वचन त्याने दिलं. 

पण पृथ्वीवर परतण्यासाठी मोठी अडचण आहे, पण त्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं त्याने तिला पटवून दिलं. प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या महिलेला त्याचा शब्द खरा वाटला. त्या महिलेने त्याला पैसे देण्याचं ठरवलं आणि थोडेथोडके नाहीत तर तब्बल 4.4 मिलियन येन म्हणजे जवळपास 25 लाख रुपये त्याच्या अकाऊंटला ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यावर आरोपीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तो आणखी पैसै मागायला लागला. 

यानंतर त्या महिलेला संशय आला आणि तीने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. पण फसवणूकीचं हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच गाजलं.