जगाला जमलं नाही ते अफगाणी बुरखाधारी महिलांनी करून दाखवलं

जे इतर कुठल्याच देशातल्या महिलांना जमलं नाही, ते काबुलमधल्या महिलांनी करुन दाखवलंय... चेहऱ्यावरचा बुरखा दूर करतानाही, जिथे परवानगी घ्यावी लागते, त्याच देशात महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठीचं टीव्ही चॅनेल सुरू केलंय. 

Updated: Jun 23, 2017, 03:22 PM IST
जगाला जमलं नाही ते अफगाणी बुरखाधारी महिलांनी करून दाखवलं  title=

नवी दिल्ली : जे इतर कुठल्याच देशातल्या महिलांना जमलं नाही, ते काबुलमधल्या महिलांनी करुन दाखवलंय... चेहऱ्यावरचा बुरखा दूर करतानाही, जिथे परवानगी घ्यावी लागते, त्याच देशात महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठीचं टीव्ही चॅनेल सुरू केलंय. 

अफगाणिस्तानात बाजार, दुकानं, रस्ते सगळे माणसांनी भरलेले दिसतात. सगळा कारभार पुरुषांच्याच हाती... रस्त्यावर बाई फिरताना दिसणं अवघडच... 'डोमेस्टिक व्हायलन्स' अर्थात महिलांवर घरगुती हिंसाचार ही इथल्या घर घर की कहानी... स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला फारच थोड्या... काही सरकारी कार्यालयं, स्वयंसेवी संस्था आणि हॉस्पिटल्स सोडली, तर इतर व्यवसायांत महिला दिसत नाहीत... पण या अफगाण महिलांची ओळख बदलायची, असा निश्चय काही जणींनी केला... आणि त्यातूनच जन्म झाला झॅन टीव्हीचा...

झॅन टीव्ही...

झॅन म्हणजे स्त्री.... महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाच पाहिजे, या हेतूनं अफगणिस्तानातल्या ६० धाडसी महिला पुढे आल्या आणि सुरू झालं महिलांचं, महिलांनी, महिलांसाठी चालवलेलं एकमेव टीव्ही चॅनल... ज्या देशात बाईला अत्यंत हीन दर्जा दिला जातो, त्याच देशात महिलांनी पुढे येऊन हे करुन दाखवलंय, हे विशेष. 

“THIS CHANNEL HAS BEEN ESTABLISHED TO ACHIEVE MORE JUSTICE. WE WANT A JUST SOCIETY. WE WANT THE SAME RIGHTS AS MEN. WE WANT TO BE ALLOWED TO WORK TOGETHER WITH OUR BROTHERS TO CONTRIBUTE IN MAKING OUR SOCIETY MORE OPEN-MINDED.” - LIDA GHAFORI, SOCIAL MEDIA MANAGER

झॅन टीव्ही ही हमिद समराहची आयडिया... स्त्री-पुरुष समानतेसाठी आग्रही असलेला काबुलमधला हा धाडसी तरुण... अफगाणिस्तानातल्या अनेक घरांतल्या महिला अक्षरशः नजरकैदेत असतात... घराचा उंबरठा ओलांडायचा असेल तर तो नवरा सोबत असेल तरच... पण याही परिस्थितीत या महिलांनी चार भिंतींची लक्ष्मणरेषा ओलांडायचं ठरवलं... आणि त्यांना साथ दिली हमिद समराहनं... 

या झॅन टीव्हीमध्ये काम करण्यासाठी महिलांना त्यांच्या घरीही बराच संघर्ष करावा लागला... चॅनल म्हटलं की वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करावं लागतं... मुळात बाई नोकरीसाठी बाहेर पडते, ही कल्पनाच ज्या देशात पचनी पडणं अवघड, त्याच देशात महिला एखाद्या चॅनलमध्ये शिफ्टमध्ये काम करणार म्हणजे मोठं आव्हनच... 

झॅन टीव्हीमध्ये अँकर्स, प्रोड्युसर्स, कॅमेरा ऑपरेटर्स आणि तांत्रिक कामंही महिलाच करतात... सध्या या चॅनेलवर महिलांसंदर्भातल्या प्रश्नांची चर्चा, आरोग्य, सौंदर्य आणि काही सांगितिक कार्यक्रम सुरू आहेत. महिलांसंदर्भातल्या बातम्याही झॅन टीव्हीनं सुरू केल्यात... मुळात घरातल्या चार भिंतीत कोंडल्यानं अफगाणिस्तानातल्या महिलांना जगाशी ओळख होण्याची संधीच मिळत नाही... अशा वेळी टीव्ही हे उत्तम माध्यम आहे, ज्यामधून त्यांना प्रेरणा मिळेल... या झॅन टीव्हीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न मांडलेही जातात आणि त्या प्रश्नांवर उपायही सुचवले जातात. 

सगळ्या चौकटी मोडून अफगाणिस्तानातल्या महिलांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय... ही नक्कीच कौतुकाची आणि धाडसाची गोष्ट... भल्या भल्या विकसीत देशांनाही जे जमलं नाही, ते अफगाणिस्तानातल्या या ६० महिलांनी करुन दाखवलंय.