नवी दिल्ली : काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये पडलेली युद्धाची ठिणगी साऱ्या जगावर दहशतीचं सावट आणणारी ठरत आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यामुळं आता या देशातून एकतर अनेकांनी पलायन केलं, तर काहींनी देशसंरक्षणार्थ शस्त्र हाती घेतली. कुस्तीपटूपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच रशियाशी दोन हात करण्यासाठी युद्ध पुकारलं. (Russia Ukraine Conflict)
इतकंच नव्हे, तर युक्रेनमधील महिलाही युद्धासाठी सज्ज असल्याचं म्हटलं गेलं. त्यातच या देशातील सर्वात सुंदर महिला आणि Former Miss Ukraine Anastassia Lenna हिचा हातात बंदुक घेतलेला एक फोटो कमाल व्हायरल झाला.
रशियाच्या विरोधात ऍनॅस्ताशिया ज्या धाडसानं उभी राहिली, यासाठी तिला अनेकांनीच शाबासकीची थाप दिली. पण, तिचा हा फोटो कितपत खरा आहे, मुळात महत्त्वाचा प्रश्न असा की, खरंच रशियन लष्कराशी लढण्यासाठी तिनं हाती शस्त्र घेतलं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न.
युद्धात सहभागी झाल्याच्या चर्चा होत असतानाच ऍनॅस्ताशिया हिनं एक लक्षवेधी पोस्ट केली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तिनं अधोरेखित केला.
‘मी काही कोणी सैन्यकर्मी नाही. एक महिला आहे. सर्वसामान्य महिला. देशातील इतर नागरिकांप्रमाणेच मी एक. मला यातून काहीच साध्य करायचं नाही. पण, युक्रेनमधील महिला भक्कम आणि तितक्याच बलशाली आहेत. त्यांचा आत्मविश्वास अद्वितीय आहे’, असं ती म्हणाली.
लेन्नाची ही पोस्ट पाहिली असता ती सैन्याच्या पोषाखामध्ये दिसत आहे. तिच्या हातात एक बंदुकही दिसत आहे. पण, ही एअर सॉफ्ट गन असल्याचं तिनं स्पष्ट केलं.
लेन्नानं ती लष्करात सहभागी नसल्याचं म्हटलं, पण देशातील बहुतांश नागरिकांनी देशाच्या संरक्षणार्थ शस्त्र हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्यानं युक्रेनवर हल्ला केला. ज्यानंतर या देशांमध्ये वाटाघाटी होण्यासाठीही पावलं उचलली गेली. पण, आता मात्र रशिया अणुयुद्धासाठी सज्ज होत असल्याची भीती संपूर्ण देशातून आणि जगातील इतर राष्ट्रांकडून व्यक्त केली जात आहे.