मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव?

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे. 

PTI | Updated: Feb 20, 2019, 12:02 AM IST
मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव? title=

पॅरिस : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पाकिस्तानचा आसरा घेतलेल्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी फ्रान्स याबाबतचा ठराव मांडणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जगभरात संतापाची लाट असून अझरला आश्रय देणारा पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये कायम पाठीशी घालणाऱ्या चीनविरोधात वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत फ्रान्स हा ठराव मांडण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ वेळा असा प्रयत्न झाला होता.

२००९ आणि २०१६मध्ये भारतानं याबाबत प्रस्ताव मांडला होता. यातल्या २०१६ साली पी-थ्री म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचं प्रस्तावाला अनुमोदन होतं. त्यानंतर २०१७ साली पी-थ्री देशांनी पुन्हा अशाच आशयाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडे सादर केला होता. मात्र या तीन्ही वेळा चीननं आपला नकाराधिकार वापरून अझरला वाचवलं होते. 

मात्र पठाणकोट हल्ल्यानंतर अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली होती. चीन वगळता सुरक्षा परिषदेतल्या एकाही देशाचा या प्रस्तावाला विरोध नाही. त्यामुळे आता फ्रान्सने प्रस्ताव मांडल्यानंतर चीन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

तर दुसरीकडे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला विनाअट पाठिंबा दिला आहे. कोणत्याही अटीशिवाय इस्त्रायल पूर्ण मदत करणार आहे. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, असे इस्त्रायलने म्हटले आहे. इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी याबाबत माहिती दिली.

पुलवामा अतिरेकी हल्ल्यामुळे देशात युद्धाचे ढग तयार झाले आहेत. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई, अशी देशावासियांकडून मागणी होत आहे. जेरुसलेम भारताला कितपत मदत करु शकतो या प्रश्नावर डॉ. रॉन मल्का यांनी हे उत्तर दिले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.