तालिबानकडून नागरिकांना मोठा दिलासा; अमेरिकेसह 100 देशांना दिलं आश्वासन

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले अफगाणी नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी मोठी बातमी 

Updated: Aug 30, 2021, 07:39 AM IST
तालिबानकडून नागरिकांना मोठा दिलासा; अमेरिकेसह 100 देशांना दिलं आश्वासन

काबूल : अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती संपूर्ण जगाला माहिती आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत.  काही परदेशी नागरिक देखील अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. अशात अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीसह सुमारे 100 देशांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने अफगाणिस्तानवर संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनानंतर तालिबानने या देशांना आश्वासन दिलं आहे. 

ज्या अफगाणी आणि परदेशातील नागरिकांकडे योग्य कागदपत्रे आहेत, त्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडता येणार आहे. अमेरिका परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'संयुक्त निवेदन जारी करणारे सर्व देश, त्यांचे नागरिक आणि त्यांच्यासाठी काम करणारे अफगाण नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी वचनबद्ध असणार आहेत.'

100 देशांनी अफगाण नागरिकांना दिला दिलासा
सर्व देश अफगाणिस्तानमधील नागरिकांना आपल्या देशात येण्यासाठी आवश्यक कागदपत्र देतील. त्याचबरोबर तालिबानकडून या देशांना अशी अपेक्षा आहे की, तालिबान अशा अफगाण नागरिकांना थांबवणार नाही. असं देखील या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आता ज्या नागरिकांकडे योग्य कागदपत्रे आहेत, त्यांना अफगाणिस्तान सोडता येणार आहे. 

दरम्यान, काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी जमली आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. अफगाणिस्तानचा बहुतांश भाग तालिबान या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात गेला आहे. मात्र काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कची आहे.