तरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला.   

शिवराज यादव | Updated: Oct 12, 2023, 07:38 PM IST
तरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द title=

इस्त्रालयवर हल्ला केलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. इस्त्रायलवर आधी रॉकेट डागल्यानंतर हमासचे दहशतवादी सीमा ओलांडून देशात घुसले आणि नरसंहार सुरु केला. हमासच्या दहशतवाद्यांनी घरं, डान्स पार्टी आणि रस्त्यावर सगळीकडे लोकांना ठार केलं. अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले. दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांना ओलीस ठेवलं आहे. पण दहशतवाद्यांचं पाशवी कृत्य एवढ्यावरच थांबलेलं नाही. हत्या केल्यानंतर ते पीडितांच्या मोबाईवरुन त्यांच्या कुटुंबीयांना फोटो, व्हिडीओ पाठवत आहेत. एका महिलेला अशा धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याच्या आईला व्हिडीओ पाठवला.  

इस्त्रायलच्या एका रिअॅलिटी टीव्ही स्टारने या घटनेची माहिती दिली आहे. ही घटना सांगताना तिलाही आपले अश्रू अनावर होत होते. मोर राडमीने सांगितलं आहे की, "दक्षिण इस्त्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये घुसले होते. येथील लोकांना ओलीस ठेवत गाझाला नेण्यात आलं".

या ठिकाणावरुन आतापर्यंत 260 पेक्षा जास्त मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दहशतवाद्यांनी लोकांना अत्यंत क्रूरपणे ठार केलं आहे. नेगेव डिजर्ट येथे या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. हमासने येथे घुसखोरी करण्याआधी त्याच दिवशी शनिवारी सकाळी 20 मिनिटात इस्त्रायलवर 5000 रॉकेट डागले होते. 

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, राडमीने सांगितलं आहे की रक्तपिपासू दहशतवाद्यांनी लोकांवर क्रूर अत्याचार केले आहेत. मला दिवसभर अनेक लोक मेसेज पाठवत असतात. यातील एका मेसेजने मला फार भावूक केलं आहे. 

"मला माझ्या एका चांगल्या मित्राबद्दल सांगायचं आहे. तिचा मुलगा पार्टीतून बेपत्ता झाला आहे. तिला आज दहशतवाद्यांनी एक व्हिडीओ पाठवला आहे. या व्हिडीओत दहशतवाद्यांनी तिचा मुलगा आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली आहे. दहशतवाद्यांनी तिच्या मुलाच्याच मोबाईलवरुन हत्येचा व्हिडीओ शूट करत तिला पाठवला".

सीएनएने इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ता ताल हेनरिक यांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. यात लिहिलं आहे की, "दक्षिण इस्त्रायलच्या कबरीत आज नवजात आणि लहान मुलांचे कापलेले शीर सापडले आहेत". हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसंच 150 पेक्षा अधिक लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे.