बेनझीर भुत्तोंच्या मुलावर शेलक्या भाषेत टीका केल्याने इम्रान खान ट्रोल

उर्दू भाषेत महिलांसाठी 'साहिबा' हे संबोधन वापरले जाते.

Updated: Apr 24, 2019, 11:38 PM IST
बेनझीर भुत्तोंच्या मुलावर शेलक्या भाषेत टीका केल्याने इम्रान खान ट्रोल title=

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना बुधवारी एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे चिरंजीव बिलावल भुत्तो यांना 'साहिबा' म्हणून हिणवले. उर्दू भाषेत महिलांसाठी 'साहिबा' हे संबोधन वापरले जाते. दक्षिण वझिरीस्तान येथील एका कार्यक्रमात बोलताना इम्रान खान यांनी म्हटले की, मी संघर्ष आणि मेहनत करून सत्तापदापर्यंत पोहोचलो आहे. मला बिलावल साहिबा यांच्याप्रमाणे आईच्या पुण्याईने पक्षाचे प्रमुखपद मिळालेले नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले. या लिंगभेदी टिप्पणीमुळे ट्विटरवर इम्रान खान यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. 

इम्रान खान यांचे हे विधान निषेधार्ह आहे. पंतप्रधानांना लिंगभेदी आणि वादग्रस्त वक्तव्य न करण्यासाठी शिकवणी देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांच्या वक्तव्यांमुळे देशाची प्रतिमा मलिन होणार नाही, असे एका पाकिस्तानी युजरने म्हटले आहे. 

तर पत्रकार गुल बुखारी यांनी ट्विट करत इम्रान खान यांना फटकारले. हे खूपच हीन पातळीचे वक्तव्य होते. बिलावल भुत्तो यांना 'साहिबा' म्हणून त्यांचे महत्त्व कमी करता येणार नाही. उलट यामुळे इम्रान खान यांचा असभ्यपणा आणि लिंगभेदी वृत्ती जगासमोर आली आहे. हा एकप्रकारे पंतप्रधान कार्यालयाचा अपमान असल्याचे गुल बुखारी यांनी म्हटले.