नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेलेत. मंगळवारी २६ फेब्रुवारी पहाटे भारतीय वायुदलानं बालाकोटमधील दहशतवादी कॅम्पला टार्गेट करून एअर स्ट्राईक केली. त्यानंतर आजही जम्मू-काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान वायुदलाच्या एफ-१६ या विमानाला पाडण्यात भारतीय सेनेला यश आलंय. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. छंगड आणि लान भागात तीन पाकिस्तान जेटनं हवाई हद्दीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या हालचाली लक्षात येताच भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावलं. माघारी फिरताना पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय सैन्यावर बॉम्ब फेकले. परंतु, या घटनेत कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही.
नुकत्याच झालेल्या इस्लामिक देशांच्या संघटनेनं पाकिस्तानात भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर टीका केलीय. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखीनच बिघडलेत. दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये सुरू असलेल्या घटना पाहून युद्धजन्य परिस्थिती समोर येतेय. अशावेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध झालंच तर पाकिस्तानला कोणकोणते देश मदत करू शकतात, तेही लक्षात घ्यायला हवं.
भारत-पाकिस्तान युद्ध छेडलं गेलंच तर पाकिस्तानच्या मदतीला सर्वात अगोदर चीन येऊ शकतो. याचं कारण म्हणजे चीनकडून पाकिस्तानात करण्यात आलेली गुंतवणूक... चीननं पाकिस्तानात तब्बल ४६ बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय. पण उल्लेखनीय म्हणजे, सद्य परिस्थितीत चीननंही पाकिस्तानची निराशा केलीय. भारताच्या एअर स्ट्राईकवर चीननं मात्र थंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळातंय.
इस्लामिक राष्ट्र असलेल्या तुर्कस्थान आणि पाकिस्तानचे पारंपरिक व्यावहारिक संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कस्तानला पाकिस्तानचा मित्रदेश मानलं जातं. नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तुर्कस्तानचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दौआन यांची भेट घेतली होती.
गेल्या अनेक अरब गणराज्य इजिप्त आणि इस्लामिक गणराज्य पाकिस्तान या उभयदेशांत संबंध चांगले राहिलेत. युद्धजन्य परिस्थितीत इजिप्तकडून पाकिस्तानला मदत मिळू शकते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पाकिस्तान आणि सौदी अरब यांचे संबंध जगापासून लपून राहिलेले नाही. नुकताच सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान पाकिस्तानात दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्ताननं पायघड्याच घातल्या होत्या. इतकंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तर राजकुमारासाठी ड्रायव्हर बनले होते.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध झालंच तर बहारेन, कुवैत, ओमान, संयुक्त अरब आमिरात अशा आखाती देशांचा पाठिंबा पाकिस्तानला मिळू शकतो.