नवी दिल्ली : इन्फोसिस कंपनीचे को-फाऊंडर एन आर नारायण मूर्ती यांचा जावई ऋषि सुनाक यांचा ब्रिटनच्या नव्या कॅबिनेटमध्ये समावेश झालाय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नव्या कॅबिनेटमध्ये तीन भारतीयांचा (मूळ) समावेश करण्यात आलाय. त्यापैंकीच ऋषी सुनाक एक आहेत. ऋषी यांच्याशिवाय आलोक शर्मा आणि प्रीती पटेल हेदेखील कॅबिनेटचा भाग बनलेत. सुनाक यांना अर्थ मंत्र्यांच्या चीफ सेक्रेटरीचं पद देण्यात आलंय.
ऋषी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्डमधून एमबीए ग्रॅज्युएट आहेत. स्मॉल ब्रिटिश बिजनेस इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांचा हातखंडा आहे. एक बिलियन डॉलरच्या गोल्बल इन्व्हेस्टमेंट फर्मचे ते सह-संस्थापक आहेत. ऋषी यॉर्कशायरच्या 'रिचमंड'मधून ब्रिटिश खासदार आहेत... गेल्याच वर्षी ऋषी सुनाक ब्रिटिश सरकारमध्ये सहभागी झाले होते. ते 'ब्रेग्झिट'चे समर्थकही आहेत. जॉन्सन यांच्या कॅबिनेटमध्ये ते आता लिज ट्रूस यांची जागा घेणार आहेत. ट्रूस हे याअगोदर अर्थमंत्र्यांचे चीफ सेक्रेटरी होते.
याअगोदर थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात चार मूळ भारतीयांचा समावेश होता. यामध्ये ऋषी सुनाक, गोव्यातील सुलेखा फर्नांडिस, सैलेश वोरा आणि आलोक शर्मा यांचा समावेश होता.
नव्या बोरिस जॉन्सन सरकारमध्ये प्रीती पटेल यांना ब्रिटनची पहिली मूळ भारतीय 'होम सेक्रेटरी' म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तर आलोक शर्मा यांच्याकडे नव्या इंटरनॅशनल डेव्हलमेंट सेक्रेटरी पदाची जबाबदारी देण्यात आलीय.
३८ वर्षीय ऋषी सुनाक कन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार आहेत. सुनाक यांचा जन्म ब्रिटनमध्येच झाला. त्यांची आई एक फार्मास्युटिकल आहे तर वडील नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) मध्ये एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करतात.
नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती आणि ऋषी यांची भेट कॅलिफोर्नियामध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता.