Man steals 3 soaps to get arrested : आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही चोरी केली अशी स्टोरी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. विविध वर्तमानपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनलवर अशा बातम्या आपण वाचतो, पाहतो. मात्र थायलंडमध्ये एक असा माणूस आहे, ज्याने एका वेगळ्याच कारणासाठी चोरी केल्याचं आता समोर आलं आहे. बरं चोरी करणारा व्यक्ती काही तरुण नाही, त्याचं वय आहे तब्बल 60 वर्ष. या माणसाने पोलिसांनी त्याला अटक करावी म्हणून मुद्दाम चोरी केली आहे. त्या माणसाला जेलमध्ये जाण्याची काही हौस नव्हती. पण त्यामागे होतं एक मोठं कारण. हे कारण ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
चोरीची ही घटना कोनबरी प्रोव्हीएन्स या भागात घडली आहे. जेंव्हा त्या इसमाला पोलिसांनी पकडलं तेंव्हा त्याने मुद्दाम चोरी केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. या माणसाचं वय पाहता त्याची जेलवारी टळावी म्हणून प्रयत्नही झाले. मात्र या माणसाने स्वतःच पोलिसांना त्याला जेलमध्येच जायचं असल्याची विनंती केली.
थायलंडच्या दक्षिण बँकॉक भागात ही चोरीची घटना घडली आहे. 29 जुलै रोजी कोनबरी प्रोव्हीएन्समधील एका मेडिकल दुकानात या वयोवृद्ध माणसाने चोरी केली. त्याने त्या मेडिकल स्टोअरमधून तीन साबण चोरले होते, ज्यांची किंमत अतिशय कमी होती. या भागात कुणी दुकानांमधून चोरी केली तर चोराला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. चोरीच्या रकमेच्या 30 पट अधिकची रक्कम चोराला भरावी लागते. मात्र तसं न केल्यास चोराला जेलमध्ये जावं लागत. या केसमध्ये ही असंच काहीसं झालं. या वृद्ध माणसाला जेलची हवा खायला लागू नये म्हणून तिथे उपस्थितांनी वर्गणी गोळा करून पैसे भरायचं ठरवलं. मात्र त्यावेळी स्वतः या माणसानेच पोलिसांनी त्याला अटक करावी असं सांगितलं.
स्वतः चोरच पोलिसांना बोलावलं जावं अशी मागणी करत होता, म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्याची चौकशी करण्यात आली तेंव्हा त्यानं त्याला जेलमध्ये का जायचंय हे स्पष्ट केलं. जेलमध्ये त्याला 3 वेळचं अन्न मिळणार होतं. सोबतच तो इतरांशी बोलू शकणार होता. जेलबाहेर त्याकडे नोकरी नव्हती, दोनवेळचं खायचीही वानवा होती.
थायलंडमध्ये सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. अशात सर्वसामान्य माणसांना दैनंदिन गोष्टी जमा करणं अशक्य होतंय. गेल्या काही वर्षांपूर्वी केवळ अटक व्हावी म्हणून एकाने बँक लुटण्याचाही प्रयन्त केला होता.